‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटकावर आधारित मालिका

Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले ‘आबा’ अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मालिका संपून आज पंधरा वर्षे झाली तरी तसे ‘आबा’ पुन्हा कधी पडद्यावर आले नाहीत, मात्र इतक्या वर्षांनंतर आता दिलीप प्रभावळकर पुन्हा नव्या व्यक्तिरेखेत छोटय़ा पडद्यावर दिसणार आहेत. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या प्रभावळकरांच्याच नाटकावर आधारित नवीन मालिका लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर येते आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा टीव्ही माध्यमात आपल्याच नाटकावरचा हा प्रयोग कसा रंगेल, याची उत्सुकता आपल्याला असल्याचे प्रभावळकर यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना सांगितले.

‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका ‘लोकसत्ता’तील ‘अनुदिनी’ या स्तंभावर आधारित होती. रोजनिशीच्या स्वरूपात तो स्तंभ मी लिहिला होता, पण अभिनेता असल्याने कदाचित लेखनात ती पात्रे, त्यातील दृश्ये ही चित्रपटात दिसतात त्याप्रमाणे लिहिली गेली होती. मालिका करताना त्यात बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मी दिग्दर्शक केदार शिंदेला दिले होते, त्यात तर संवादही गुरू ठाकूरने लिहिले होते. पण ती मालिका लोकांना खूप आवडली. त्यानंतर अनेक मालिकांबाबत विचारणाही झाली, पण त्याच त्या नेहमीच्या साचेबद्ध पद्धतीने काम करायचे नव्हते. त्यामुळे जाणीवपूर्वक मालिका टाळल्या, असे दिलीप प्रभावळकर यांनी स्पष्ट केले.

‘चुकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका माझ्याच नाटकावर आधारित आहे. त्यामुळे या मालिकेतही मी काम करावे, अशी मनवाची इच्छा होती. अभिनेत्री मनवा नाईक पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर निर्माती म्हणून दिसणार आहे. मलाही दोन तासांचे मर्यादित नाटक मालिकेत रूपांतरित करताना कसे असेल, याची उत्सुकता होती. त्यामुळे हा नवा प्रयोग करून पाहावाच, या विचाराने मालिकेला होकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी मधुगंधा कुलकर्णी यांच्यावर आहे. दोन तासांच्या नाटकावर मालिका करायची असल्याने त्यात अनेक नवीन पात्रे येतील, कथेतही बदल केले जाणार आहेत. मालिका मर्यादित भागांची असून यात स्वत: एकच व्यक्तिरेखा साकारणार असल्याची माहिती प्रभावळकर यांनी दिली. या मालिकेचे शीर्षकगीतही सुरेश वाडकर यांच्या साथीने दिलीप प्रभावळकर गाणार आहेत. चिमणराव ही माझी टेलिव्हिजनवरची पहिली मालिका. त्या मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर याच माध्यमाने ‘आबा टिपरे’ म्हणून मला लोकप्रिय केले. त्यामुळे एका गॅपनंतर या माध्यमात काही नवीन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो, असे सांगणारे प्रभावळकर सध्या चित्रपटातच चांगले रमले आहेत. नव्या वर्षांतही त्यांचे चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.