अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट थिएटरऐवजी आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. परंतु लॉकडाउनमुळे निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय सिनेमागृहांच्या मालकांना आवडलेला नाही. आयनॉक्सने तर एक पत्रक जारी करुन आपला संताप व्यक्त केला. या पत्रकावर दिग्दर्शक कुणाल कोहली याने टीका केली आहे. त्याने सिनेमागृहांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर प्रश्न उपस्थित केला आहे.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

अवश्य पाहा – रितेशने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य; व्हिडीओ होतोय व्हायरल

“आयनॉक्स सर्वप्रथम तुम्ही सांगा की तुमच्या एकूण कमाई पैकी किती पैसे तुम्हाला तिकिट विक्री व खाद्यपेय विक्रीतून मिळतात. थिएटरमध्ये विक्री होणाऱ्या खाद्यपेयांचं प्रमाण तिकिट विक्रीवर आधारित आहे. कोणीही खाण्यासाठी थिएटरमध्ये जात नाही. त्यामुळे निर्मात्यांवर टीका करण्यापूर्वी आधी त्या पैशांचा हिशोब द्या.” अशा आशयाचे ट्विट कुणालने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आयनॉक्सने काय लिहिलं होतं पत्रकामध्ये?

“कुठलाही चित्रपट हा सर्वात प्रथम सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित केला जावा. त्यानंतर तो इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आल्यास आम्हाला हरकत नाही. निर्माते आणि सिनेमागृह यांच्यात चांगले संबंध आहेत. मात्र निर्मात्यांच्या या नव्या निर्णयामुळे हे संबंध ताणले जात आहेत. लॉकडाउनमुळे तुमच्याप्रमाणे आम्हाला देखील मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. चित्रपट आणि थिएटर हे वर्षानुवर्षांचे अतुट नाते आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपण एकमेकांची मदत करायला हवी. कृपया निर्मात्यांनी OTTचा मार्ग स्विकारु नये.” अशा आशयाचा मजकुर या पत्रकामध्ये लिहिला आहे.

‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आयुषमान खुराना देखील झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शूजित सरकार याने केलं आहे. हा चित्रपट येत्या १२ जूनला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.