सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रविना टंडनने आर के लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ कार्टून ट्विटरवर शेअर केला. मात्र याच ट्विटमुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. रविवाने शेअर केलेल्या कार्टूनमध्ये स्पेलिंगच्या चुकाही नेटकऱ्यांनी शोधल्या आणि त्यावरूनही तिच्यावर टीका केली.

‘ज्यांना कोणाला आंदोलन करायचे असेल त्यांनी स्वत:ची गाडी जाळावी आणि स्वत:च्याच मालमत्तेची तोडफोड करावी’, असं त्या कार्टूनवर इंग्रजीत लिहिलं आहे. मात्र त्यातील दोन शब्दांची स्पेलिंग चुकलेली असल्याने नेटकऱ्यांनी रवीनाच्या ट्विटवर टीका करण्यात सुरुवात केली. ‘सामान्य माणूस आज धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढत आहे. कलेचा आणि आर. के. लक्ष्मण यांच्या आठवणींचा अपमान करू नकोस,’ असं एका युजरने तिला सुनावलं. रवीनाने अद्याप या ट्रोलिंगवर काही उत्तर दिले नाही.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन झालेल्या आंदोलनांवर बॉलिवूडमधील बरेच कलाकार व्यक्त झाले. आयुषमान खुराना, राजकुमार राव, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, महेश भट्ट, फरहान अख्तर, अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला.