बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडला इंडस्ट्रीबाहेरचा एक अभिनेता मिळाला. हा अभिनेता म्हणजे ‘मुक्काबाज’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विनीत कुमार सिंग. इंडस्ट्रीबाहेरचा असल्याने अनेकांप्रमाणे त्याचाही अभिनेता होईपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. वडिलांसाठी त्याने डॉक्टरची डिग्री घेतली खरी, पण त्याला करिअर करायचे होते अभिनय क्षेत्रात. काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर अखेर त्याला ‘मुक्काबाज’च्या रुपात मनासारखी कामगिरी करण्याची संधी मिळाली. १२ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षक- समीक्षकांकडून दाद मिळत आहे.

विनीत कुमारला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मात्र आईवडिलांचा अभिनय क्षेत्राला विरोध होता. पण अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या लहान भाऊ आणि बहिणीची साथ मिळाली. वडिलांसाठी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले खरे, पण अभिनयाचे वेड काही केल्याने जाईना. टीव्हीवरील एक जाहिरात पाहून तो अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी वाराणसीहून मुंबईला आला. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिली संधी दिली, पण ती अयशस्वी ठरली. अखेर एक दिवस दिग्दर्शक अनुराग कश्यपशी त्याने संपर्क साधला.

वाचा : मासिक पाळीबद्दल सोनम कपूर म्हणते..

अनुरागशी थेट संपर्क साधण्यासाठी विनीत कुमारचा बराच काळ गेला. अखेर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी ऑडीशन सुरु असताना विनीतला संधी मिळाली. त्यानंतर ‘बॉम्बे टॉकीज’, ‘अग्ली’ यांसारख्या चित्रपटांतही त्याने भूमिका साकारली. पण अभिनेता म्हणून अपेक्षेप्रमाणे ओळख मिळाली नव्हती. कॉलेजमध्ये असल्यापासूनच बास्केटबॉलची आवड असल्याने त्याने क्रीडाविषयक पटकथा लिहिण्यास सुरुवात केली. त्यात बहिण आणि काही मित्रांचीही त्याला मदत मिळाली.

वाचा : ‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

मुक्काबाजची कथा लिहिल्यानंतर तीन वर्षे त्याने स्वत:च्या प्रशिक्षणासाठी सर्वस्व वाहून घेतले. अनुरागनेही त्याला मुख्य भूमिका साकारण्यास सांगितले. मुक्काबाजला बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्येही दाद मिळाली. अनेकांनी विनीतच्या अभिनयाची प्रशंसा केली. करिअरमधील मिळालेला हा यश पाहून आता आईवडिलांनाही अत्यंत आनंद होत असल्याचे विनीत कुमार सांगतो. मुक्काबाजनंतर विनीत कुमार अक्षय कुमारच्या आगामी गोल्ड या चित्रपटात झळकणार आहे. मुक्काबाजची शूटिंग सुरु असतानाच त्याने गोल्डसाठी ऑडीशन दिले.