‘दुनियादारी’ने शंभर दिवसाचे यश मिळवत, रौप्यमहोत्सवी आठवड्याकडे यशस्वीपणे घोडदौड सुरू केली आहे, त्याने उत्पन्नात पंचवीस-तीस कोटीची कमाई केल्याच्या ‘प्रसिध्दी खात्या’कडून आलेल्या बातम्या गाजत आहेत वगैरे वगैरे कसे छानसे सकारात्मक आणि प्रफुल्लित वातावरण आहे ना? पण ‘दुनियादारी’नंतर झळकलेल्या मराठी चित्रपटाची स्थिती कशी हो राहिली? ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘टाईम प्लीज’ आणि ‘लग्न पहावे करून’ या चित्रपटांनी देखिल खूप चांगले यश मिळवले आणि मराठी चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे वातावरण कायम ठेवले. पण याच यशाआड बरेचसे मराठी चित्रपट आले नि गेले, हा ‘खेळ’ कायम राहिला हो. अर्थात, प्रत्येक चित्रपट हमखास गर्दी खेचू शकत नाही, पण तरी काही चित्रपट तरी (विशेषत: ‘संहिता’ आणि ‘वंशवेल’) यशस्वी ठरायला हवे होते.
‘धामधूम’, ‘प्रेमाचा झोलझाल’ यानी बऱ्याच ठिकाणी एकाच दिवशी झळकायचा विक्रम केल्याची बातमी प्रसिध्द होईपर्यन्त दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यातच त्यांच्या चित्रपटगृहांची संख्या आटली. मराठीतला पहिला जेम्सबॉण्ड सिनेमा अशी प्रसिध्दी केलेल्या ‘जरब’ची जरबच जाणवली नाही. ‘रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’ला दुर्दैवाने अपयशाच्या वाटेने जावे लागले. इतरही काही मराठी चित्रपट झळकल्याची नोंद झाली इतकेच.
प्रत्येक मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ सारखी मुसंडी मारू शकत नाही, पण त्यांना अगदीच दुर्लक्षूनही चालणारे नाही. त्यांचीही ‘खबर’दारी हवी.