मनोरंजन.. 

‘बरसात’ व्हिडीओ यु टय़ूब चॅनेलवर
‘सारेगम’ लिटिल चॅम्पमधील एक स्पर्धक शमिका भिडे हिने गायलेल्या एका गाण्याचा ‘व्हिडिओ’ तयार करण्यात आला आहे. युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने आपल्या ‘युनिव्हर्सल म्युझिक इंडिया’या यु टय़ूब चॅनेलवर हेगाणे प्रकाशित करण्यात आले आहे. या गाण्याचे संगीतकार केदार दिवेकर असून गीतकार वलय मुळगुंद व संगीत संयोजक गौरव कोरगावकर हे आहेत. पांडुरंग पवार, किरीट मांडवगणे, गायत्री गोरे, सत्यजित केळकर यांनी संगीतसाथ केली आहे. युनिव्हर्सलचे मंदार गुप्ते व राजन प्रभू यांच्या पुढाकाराने हे गाणे तयार करण्यात आले असून ते शमिकावरच चित्रीत करण्यात आले आहे.
‘विठ्ठला शप्पथ’च्या चित्रीकरणास सुरुवात
चंद्रकात पवार दिग्दर्शित ‘़िवठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातील एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सांगली येथील बुधगाव, हरिपूर आणि परिसरात चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटात मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, कृतिका गायकवाड, केतन पवार, अंशुमन विचारे, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे हे प्रमुख कलाकार आहेत. चिनार-महेश हे चित्रपटाचे संगीतकार आहेत.
‘चाहतो मी तुला’ चित्रपटाचा मुहूर्त
कविता प्रॉडक्शनचा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच वसई-विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या वेळी अभिनेत्री अरुणा इराणी, दिग्दर्शक किर्तीकुमार, कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जाधव आणि अन्य कलाकार आहेत.
स्मिता तांबे हिचे लावणी नृत्य
‘जीत’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे हिचे लावणी नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संजय पाटील यांनी हे लावणी गीत लिहिले असून ते वैशाली सामंत यांनी गायले आहे. या लावणीचे नृत्य दिग्दर्शन चिन्नी प्रकाश व रेखा प्रकास यांनी केले आहे. चित्रपटात भूषण प्रधान, सयाजी शिंदे, शरद पोंक्षे, मनोज जोशी, विलास उजवणे आणि अन्य कलाकार आहेत.
‘भय’ चित्रपटात होणार दुबई दर्शन
आगामी ‘भय’ या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना दुबई दर्शन घडणार आहे. बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, मरिना बीच आदी ठिकाणी चित्रपटाच्या काही दृश्यांचे तसेच दोन गाण्यांचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. स्मिता गोंदकर, अभिजीत खांडकेकर, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोडके हे कलाकार गाण्याच्या चित्रीकरणात सहभागी झाले होते. नृत्य दिग्दर्शक अजय देवरुखकर, सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर, दिग्दर्शक व संकलक राहुल भातणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही गाणी चित्रीत करण्यात आली.