बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर विदेशातही आहे. प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता सातासमुद्रापार गेली आहे. मात्र या कलाकारांप्रमाणेच विदेशातील कलाकारही भारतात तितकेच लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयाची भूरळ केवळ येथील प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूडकरांनाही आहे. त्यामुळे चीनमधील एका अभिनेत्याला दुसऱ्यांदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘क्वीन’ या चित्रपटात झळकलेला ‘टाका’ साऱ्यांच्याच लक्षात असेल. पॅरिसमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या राणीला टाका हा नवा मित्र भेटतो. या चित्रपटामध्ये टाका ही व्यक्तीरेखा ‘जेफरी ची इंग’ या चीनच्या अभिनेत्याने साकारली असून छोटेखानी भूमिका साकारुनही त्याचा अभिनय अनेकांच्या लक्षात राहिला. त्यामुळेच ‘क्वीन’नंतर ‘मेड इन इंडिया’ हा चित्रपट त्याच्या पदरात पडला आहे.
‘मेड इन इंडिया’ या चित्रपटामध्ये जेफरी ची इंग याने एका चीनी व्यावसायिकाची भूमिका केली आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव याची मुख्य भूमिका असून तो कामानिमित्त चीनमध्ये जातो आणि त्याची या व्यावसायिकासोबत भेट होते. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये जेफरी ची इंग अनेक सीन असून सध्या ते चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
दरम्यान, जेफरी ची इंगने २०१४ मध्ये क्वीन या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाच्या सेटवर जेफर ची इंग आणि कंगनाची चांगली मैत्री झाली होती. चीनमधील लोकप्रिय अभिनेता जेफरी ची इंगचा जन्म मलेशियामध्ये झाला असून तो सध्या लंडनमध्ये राहतो. जेफरी ची इंगने लंडन स्कूल ऑफ ड्रामेटिक्स येथून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. जेफर हा अभिनयाशिवाय एक उत्तम गायक, डान्सर आणि संगीतकारदेखील आहे. इतकंच नाही तर तो टेनिस आणि स्विमिंगमध्येदेखील तरबेज आहे.