चित्रपटांनंतर एकच शब्द प्रामुख्याने अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तरच्या कोशात येतो तो म्हणजे गाणे. फरहानने चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत आणि गायलीही आहेत, मात्र अन्य निर्मात्यांच्या चित्रपटात तो फारसे गाताना दिसत नाही. आगामी ‘वझीर’ या चित्रपटात खास निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या आग्रहावरून फरहानने गाणे गायले आहे. फरहानचे हे गाणे चित्रपटाचा भाग असणार नाही. ते स्वतंत्रपणे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापरले जाणार असून चित्रपट संपताना ते दाखवले जाणार आहे.
‘रॉक ऑन’पासून ते ‘दिल धडकने दो’ या आत्ताच्या चित्रपटापर्यंत फरहानने अनेकदा गाणी गायली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त त्याचा वेळ हा प्रामुख्याने त्याच्या बॅण्डचा असतो. ‘फरहान लाइव्ह’ असे त्याच्या बॅण्डचे नाव असून तो अनेकदा देश-परदेशात जाहीर गाण्यांचे कार्यक्रमही करत असतो. गाण्यांसाठी प्रसिद्धीमाध्यमांपासूनही दूर राहणाऱ्या फरहानसाठी अभिनयानंतरचा सगळा वेळ हा गाण्यांचा असतो. मात्र स्वत:च्या ‘एक्सेल एण्टरटेन्मेट’ आणि बहीण झोया अख्तरच्या चित्रपटांमधून फरहानने आजवर गाणी गायली आहेत. ‘वझीर’च्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच विधू विनोद चोप्रा यांच्या सांगण्यावरून गाणे गायले आहे. ‘अतरंगी यारी’ असे या गाण्याचे बोल असून मैत्रीवरून हे गाणे रचण्यात आले आहे.
‘वझीर’मध्ये अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांच्यात गहिरी मैत्री दाखवली आहे. बुद्धिबळाच्या खेळामुळे त्यांच्यात हे मैत्रीचे धागे विणले जातात आणि याच मैत्रीमुळे एका टप्प्यावर आयुष्याची लढाई जिंकण्यासाठी ते दोघेही एकमेकांच्या मदतीने उभे राहतात. बिजॉय नम्बियार दिग्दर्शित ‘वझीर’ या चित्रपटाच्या कथानकाचे सार या गाण्यात येईल, अशा पद्धतीने ते लिहिण्यात आले आहे. गुरुप्रीत सैनी आणि दीपक रामोला यांनी ‘अतरंगी यारी’ हे गाणे लिहिले असून रोचक कोहलीने गाणे संगीतबद्ध केले आहे. ‘वझीर’ या चित्रपटापासून फरहानच्या नव्या वर्षांची सुरुवात होणार असून पहिल्यांदाच या चित्रपटात तो अॅक्शन हिरोच्या भूमिकेत समोर येणार आहे. विधू विनोद चोप्रा यांची संयुक्त निर्मिती, ‘रिलायन्स एण्टरटेन्मेट’चे वितरण असलेला हा चित्रपट नवीन वर्षांच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे.