संपूर्ण देश करोना विषाणूच्या कचाट्यात सापडला आहे. यात भारताचादेखील समावेश आहे. त्यामुळे या विषाणूपासून वाचण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सध्या मुंबईमध्येदेखील लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम छोटे व्यावसायिक, व्यापारी आणि मजदूर अशा कामगार वर्गावर होताना दिसतोय. त्यामुळे आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार, मान्यवर मंडळी या कामगार वर्गाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये मराठी फॅशन डिझायनर अनिता डोंगरेदेखील या गरजूंच्या मदतीला धावून आली आहे.

मराठी मध्यमवर्गीय घरातून येऊन फॅशन इंडस्ट्रीसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात नाव कमवणाऱ्या आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारी फॅशन डिझायनर म्हणून अनिता डोंगरेकडे पाहिलं जातं. हातावर पोट चालविणाऱ्या गरजूंसाठी अनिताने मदतीचा हात पुढे केला असून १ कोटी ५० लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गरजू, लहान व्यापारी आणि अन्य कामगारांचा वैद्यकीय विमा नाहीये अशा व्यक्तींना अनिता या १ कोटी ५० लाख रुपयाच्या माध्यमातून मदत करणार आहे. ‘माझ्याकडून या साऱ्यांना एक लहानशी मदत’, असं म्हणत तिने मदतीचा हात पुढे केला आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.

सध्या अनिता जे काम करत आहे, ते पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्या व्यक्तींना लहानसहान आजारातही उपचार करणं शक्य नसतं. ते लोक सध्याच्या परिस्थितीचा कसा सामना करतील? त्यामुळे मी ही मदत करत आहे. तसंच वेळ पडल्यास या निधीत वाढदेखील करेन असं अनिताने सांगितलं.

वाचा : Coronavirus : घरात राहून ‘या’ कामात रमतीये कतरिना; पाहा तिचा हटके व्हिडीओ

दरम्यान, अनिताप्रमाणेच प्रशांत दामले, प्रकाश राज, ‘प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ आणि आनंद महेंद्रा यांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.अनिता डोंगरे गेल्या २०-२१ वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. ‘ग्लोबल देसी’ आणि ‘हाऊस ऑफ अनिता डोंगरे’ या ब्रॅण्ड अंतर्गत फॅशन विश्वात तिने अनेक प्रयोग केले आहेत. जगभरातील बारा ब्रॅण्ड स्टोअर्सच्या माध्यमातून अनिता डोंगरने आपल्या ब्रॅण्डचा झेंडा जागतिक स्तरावरील फॅशन विश्वात फडकत ठेवला आहे.