मराठ्यांचे पराक्रमी पर्व शिवाजी महाराजांपासून सुरु होते. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. आजही त्यांच्या युद्धनीतीचे धडे जगभरामध्ये सैन्यदलांना दिले जातात. त्यांच्या कुशल युद्ध नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा लवकरच ‘फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नुकतीच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी इतिहासातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार कसा उभा केला याचे अनुभव कथन यावेळी केले.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. ‘फत्तेशिकस्त’ १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.