करोना विषाणूचे संक्रमण नियंत्रीत करण्यासाठी देशभरात लॉकडाउन जारी करण्यात आला. मात्र या लॉकडाउनमुळे मनोरंजन उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. आता हे लॉकडाउन उठवलं तरी चित्रपट उद्योगाचा मोडलेला कणा पूर्ववत करणे फारच कठीण असल्याचे मत दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी व्यक्त केले. आता चित्रपट तयार करणं आणखी महागडं होणार अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल ढोलकिया यांनी करोनामुळे चित्रपट उद्योगात होणाऱ्या बदलांविषयी भाष्य केले. ते म्हणाले, “आज ना उद्या लॉकडाउन उठवला जाईल. परंतु लस मिळेपर्यंत करोनाची भीती कायम राहील. यापुढे चित्रपट तयार करणं आणखी महागडं होणार आहे. कारण आता सेटवर अधिक लोकांना जमा करुन काम करणं शक्य होणार नाही. शिवाय सेटवरील प्रत्येक माणसाला स्वच्छ राहणं, सतत हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं, मास्क वापरणं बंधनकारक असेल. परिणामी चित्रपटाचं बजेट निश्चित करताना त्यामध्ये आता स्वच्छतेचा खर्चही वाढवावा लागेल. हा वाढीव खर्च कमीत कमी ३० टक्के तरी असेल.” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

राहुल ढोलकिया बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर लम्हे, रईस, परझानिया, मुंबई कटिंग, केहता है दिल बार बार यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते मुक्तपणे प्रतिक्रिया देत असतात. या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत सध्या चर्चेत आहे.