dilip thakurविविध प्रकारच्या गेटअप्सना प्राधान्य देऊन आपली वेगळीच ओळख निर्माण करणारा कमल हसत हिंदीत फारसा का रमला नाही हा त्याच्या चाहत्यांच्या मनातील कायमचा प्रश्न. खरं तर के. बालचंदर दिग्दर्शित ‘एक दुजे के लिए'(१९७९) पासून त्याचे हिंदीत छान यशस्वी पाऊल पडले. तरी त्याला हिंदी चित्रपटसृष्टीची कार्यशैली फारशी मानवली नाही अशी बरीच चर्चा रंगली. चित्रीकरण सत्र रद्द होणे, सेटवर स्टार्सनी आठवणीने उशिराच येणे, चित्रपट प्रदर्शनाची निश्चिती नसणे याला तो कंटाळून गेला आणि अशातच आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. तमिळमध्ये अगदी वेगळेच म्हणून गाजलेल्या व गल्ला पेटीवर खणखणीत यशस्वी ठरलेल्या चित्रपटाना हिंदी रिमेकमध्ये कौतुकाशिवाय काहीही मिळाले नाही. के. बालचंदर दिग्दर्शित ‘जरा सी जिंदगी’, बालू महेंद्रू दिग्दर्शित ‘सदमा’ ही दोन महत्त्वाची उदाहरणे आहेत. अशा वेळेस कमल हसनने काय बरे करावे? त्याने आता आपल्या मसालेदार मनोरंजक अशाच तमिळ चित्रपटांची हिंदीत रिमेक करण्यास प्राधान्य दिले. असाच त्याचा अतर्क्य घटनानी भरलेला दुहेरी भूमिकेतील ‘सत्तम इन कैयेई’ हा तमिळ चित्रपट हिंदीत रिमेक करण्यात आला. आता चित्रपटाचे नाव होते, ‘यह तो कमाल हो गया’ (१९८२) दिग्दर्शक नरेंद्र बेदी. त्यांनीच दिग्दर्शिलेल्या ‘सनम तेरी कसम’ (नायिका रिना रॉय) यशस्वी ठरल्याने कमल हसनला त्यांच्याकडून काही अपेक्षा असणारच. बरं, नरेंद्र बेदीकडे ‘द ट्रेन’, ‘जवानी दीवानी’, ‘बेनाम’, ‘अदालत’, ‘रफु चक्कर’ अशा अनेक सुपर हिट चित्रपटांचा अनुभव. पण म्हणून काय ‘यह तो कमाल हो गया’लाही रंजकता येईल असे नाहीच. इतरही हिंदी चित्रपटांची चित्रीकरणे सांभाळत हा चित्रपट पूर्ण करावा लागला. पूनम धिल्लाँन यात नायिका होती. त्याशिवाय ओम शिवपुरी, विजय अरोरा, सत्येन कप्पू, आशालता, रणजीत, दीना पाठक इत्यादी कलाकार होते. आर. डी. बर्मनच्या संगीतातील एक दोन गाणी लोकप्रिय देखिल झाली. अर्थात मुख्य आकर्षण कमल हसनची दुहेरी भूमिका हेच. पण हा मनोरंजनाचा मसाला हिंदीत नवा नव्हता व जे काही पडद्यावर आले त्यात अपेक्षित रंजकता नव्हती. या चित्रपटाप्रमाणेच हिंदीतील त्याचे ‘यादगार’, ‘राज तिलक’, ‘करिश्मा’ इत्यादी अनेक चित्रपट फसले. छान जमलेल्या चित्रपटांपेक्षाही (‘सागर’ इत्यादी) त्याच्या अपयशी हिंदी चित्रपटाचे प्रमाण तेव्हा जाणवे. त्यापेक्षा तो तमिळ, तेलगुत रमला व आपले ‘अप्पू राजा’, ‘हिन्दुस्तानी’, ‘हे राम’ असे त्या भाषेतील चित्रपट हिंदीतही डब केले. संवादरहित ‘पुष्पक’ त्याने केला. सेन्सॉरने त्याला तमिळ भाषेतील चित्रपट असेच प्रमाणपत्र दिलेय. ‘चाची 420’ मात्र त्याने हिंदीत निर्माण केला. कमल हसन हिंदीपेक्षा दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात रमला म्हणूनच तर ‘विश्वरूपम’पर्यंतची त्याची वाटचाल पाहता म्हणावेसे वाटते, ‘यह तो कमाल हो गया…’
दिलीप ठाकूर