मानसी जोशी

गणेशोत्सव म्हटल्यावर नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. गणेशोत्सवासाठी कल्पकतेने आरास तसेच सजावट करणे, कुटुंबाचे एकत्र जमणे, रात्रीचा गप्पांचा जागर, मित्रांसोबत मुंबईत लालबाग, गिरगाव आणि पुण्यात मानाचे गणपती पाहण्यासाठी घालवलेली रात्र अशी मजा करोनामुळे यंदा करता येणार नाही. तरीही घरोघरी आपपल्या परीने गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. असाच उत्साह करोनामुळे तीन महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर कार्यरत झालेल्या छोटय़ा पडद्यावरच्या मालिकांमध्येही आहे. या वर्षी सुरक्षेचे सर्व नियम पाळून मालिकेच्या सेटवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने गणरायाच्या आगमनामुळे जगातील करोनाचे विघ्न टळू दे, सर्वत्र नागरिकांचे आरोग्य उत्तम राहू दे असे साकडेही कलाकारांनी घातले आहे.

यंदा मालिकेतही कलाकार मातीपासून गणेशमूर्तीची निर्मिती, तलावाऐवजी घरच्या घरी विसर्जन याद्वारे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा क रत आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्रेक्षकांना हिंदी आणि मराठी मनोरंजन वाहिन्यांवर संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहता येईल. चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची ‘झी मराठी’च्या मालिकेतील कलाकार मंडळीनी मनोभावे पूजा केली. ‘माझा होशील ना’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकांच्या सेटवर करोनाचे सर्व नियम पाळत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होतो आहे. ‘स्टार प्रवाह’वरीन ‘वैजू नंबर वन’ मालिकेच्या सेटवर तिसरी मंझिल चाळीतील लोकांनी गणपतीची साग्रसंगीत पूजा केली. वर्गणी गोळा करण्यापासून ते बाप्पाची मूर्ती तयार करणे ही कामे त्यांनी एकत्र पार पाडली. यासाठी त्यांनी चाळीच्या आवारातच बाप्पाच्या मूर्तीसाठी एक कृत्रिम तलाव तयार केला आहे. त्या तलावात गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. याचबरोबर ‘स्टार प्रवाह’वर गणेश चतुर्थीचे औचित्य साधून ‘देवा श्री गणेशा’ ही अकरा भागांची मालिका दाखवण्यात येते आहे. यात गणपतीच्या जन्मापासून ते लग्नापर्यंत फारशा परिचित नसलेल्या पौराणिक कथा प्रेक्षकांना पाहण्यास मिळतील. आपल्याकडे गणेश चतुर्थीच्या प्रसंगी चंद्र पाहिल्यास चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे. या कथेशी निगडित पुराणातील धागेदोरे प्रेक्षकांना दाखवले जाणार आहेत. ऐतिहासिक सेट साकारणारे सिद्धार्थ तिवारी यांची निर्मिती असलेल्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेचे उमरगाम येथे चित्रीकरण सुरू आहे.

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘प्रेम पॉयजन पंगा’ मालिकेत देसाईंच्या घरामध्ये गणेश आगमनाची तयारी सुरू आहे. करोनाचे सावट असल्याने देसाई कुटुंबाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. यामुळे जुईने घरातच ओल्या मातीपासून सुबक गणेशमूर्ती घडवली असून, सजावटही नैसर्गिकरीत्या केली आहे. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत यंदाही नचिकेतच्या घरात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार असून, सई घरात काहीतरी कारणानिमित्ताने त्याच्याकडे जाते. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी एकवीस गणपतींचे दर्शन घेणारे अप्पा वीस गणपतींचे दर्शन घेतात. वाटेत त्यांचा पाय मुरगळतो. यंदा एकवीस गणपतींचे दर्शन घेण्यासाठी ते नचिकेतच्या घरी जातात का हे या भागात प्रेक्षकांना कळेलच.  प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेली ‘कलर्स मराठी’वरील ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेच्या सेटवरही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो आहे. शिवा गणरायाची प्रतिष्ठापना करणार असून, सिद्धीने गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. या आनंदमय वातावरणात शिवा कुटुंबाला एक गोड बातमी सांगणार आहे. तर रणजीत ढाले पाटील आणि संजीवनी लग्नानंतर प्रथमच गणेशेत्सव साजरा करणार आहेत. गणरायाच्या आगमनाने ‘राजा राणी ची गं जोडी’ मालिकेत ढाले पाटलांचे घर आनंदाने उजळून निघाले आहे.

‘सोनी मराठी’वरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत भालेराव कुटुंबावर आलेल्या संकटाचा कसा सामना करतात हे पहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व भालेराव कुटुंब एकत्र येत गणपतीची प्रतिष्ठापना करतात. घरावरचे संकट टळू देत, अशी प्रार्थना देवाकडे करतात. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला गणपती सर्वसामान्य लोकांचे दुख कसे दूर करतो हे मांडणारी विशेष भागांची ‘देव पावला’ ही मालिका ‘फक्त मराठी’ वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.

हिंदीतही उत्साह

‘कलर्स’ वाहिनीवरील ‘इश्क मे मरजावा’ मालिकेतही गणरायाचे आगमन झाले आहे. यात मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळीच गंमत पाहायला मिळणार आहे. घरातील सर्व सदस्य गणपतीच्या तयारीत गुंतले असताना नायिका रिद्धीमा वंशचे भूतकाळातील सत्य जाणण्याचा प्रयत्न करते. ‘झीटीव्ही’वरील ‘तुझसे हे राबता’ मालिकेत वाजतगाजत गणेशमूर्ती आणली असून, कलाकार गणपतीची सजावट करण्यात दंग आहेत.

वाहतूक सुविधा 

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने मालिकेचे लाईटमन, स्पॉट दादा, मेकअपमन यांच्या घरी गणेशमूर्ती पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे या पडद्यामागील कलाकारांना गणेशमूर्ती घरी आणणे शक्य नाही. याचबरोबर करोनामुळे वाहतुकीस असलेले निर्बंध आणि पाऊस अशा अनेक कारणांमुळे घरी गणेशमूर्ती आणायची कशी ही चिंता त्यांना सतावत होती. यावर उपाय म्हणून वाहिनीने गणपती मंडळापासून ते तंत्रज्ञ कलाकारांच्या घरापर्यंत गणेशमूर्ती पोहोचवण्यासाठी वाहनाची सोय केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी सूचनांचे पालन करत नालासोपारा, चांदिवली, गोरेगाव, ठाणे आणि मुलुंड या भागात नुकतेच बाप्पाची मूर्ती या तंत्रज्ञांच्या घरी पोहोचवण्यात आली. निर्जंतुकीकरण, वाहनात एका वेळी फक्त दोनच लोकांना प्रवेश या सुरक्षा उपाययोजनांसह मालिकेतील तंत्रज्ञांना गणेशमूर्ती घरपोच देण्यात आली.