व्यक्तिगत माहिती
शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत (डिसेंबर १२, १९५०) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता,मनोरंजन व्यवसायातील प्रसिद्ध व्यक्ती,चित्रपटातील एक मोठे व्यक्तीमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहे.एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेले ३८ वर्षापासुन तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील (‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत,तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत.
पार्श्वभूमी
रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा हेन्द्रे पाटील (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.रजनीकांत ह्यांना दोन मोठे भाऊ आणि एक बहिण देखील आहे.शाळेत असतांना गरिबीमुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले.बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं केली.त्यानंतर ते बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून दाखल झाले.चित्रपट काम करण्याच्या जिद्दी मुळे आणि एका मित्राच्या मदतीने ते त्यानंतर चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.मद्रास फिल्म इंस्टीट्यूट मध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५मध्ये सुरू केली.