बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या संधीची वाट प्रत्येक कलाकार पाहत असतो. हीच संधी जर मिळाली आणि दुसऱ्या काही कारणास्तव शूटिंग रद्द करावं लागलं तर पुन्हा त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळणं किती कठीण असतं हे अनेकांनाच माहित असेल. अशी वेळ येऊ नये म्हणून कामाप्रती निष्ठावान असलेले दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी रुग्णालयातून काही वेळासाठी ब्रेक घेत शूटिंगला धावून आले.

‘हेलिकॉप्टर ईला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांना डेंग्यूचं निदान झाल्याने मुंबईतील एका रुग्णालयात ते उपचार घेत होते. रुग्णालयाकडून विशेष परवागनी घेऊन ते बिग बींसोबत शूट करण्यासाठी आले. या चित्रपटात बिग बी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून १४ ऑगस्ट रोजी शूटिंगसाठी त्यांच्याकडून वेळ घेण्यात आली होती. मात्र प्रदीप सरकार हे ११ ऑगस्टपासूनच आजारी होते. शूटिंग रद्द होऊ नये म्हणून डॉक्टरांची परवानगी घेऊन काही तासांसाठी अंधेरीतल्या स्टुडिओकडे रवाना झाले.

वाचा : अनुष्काच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल 

सरकार यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सेटवर रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली होती. ‘हॅलिकॉप्टर ईला’ या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करत असून यात काजोलची मुख्य भूमिका आहे. शूटिंगनिमित्त अजय शहराबाहेर असल्याने काजोलने सेटवर जाऊन दिग्दर्शक आणि बिग बींची भेट घेतली. शूटिंग व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर प्रदीप सरकार पुन्हा रुग्णालयात दाखल झाले.