‘सुपरमॅन’ ही सुपरहिरो जगातील आजवरची सर्वात यशस्वी व्यक्तिरेखा आहे. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या सुपरहिरोला सध्या अभिनेता हेन्री केव्हील रुपेरी पडद्यावर साकारताना दिसत आहे. परंतु ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’ आणि ‘जस्टिस लीग’ हे दोन सुपरहिरोपट एकामागून एक फ्लॉप झाल्यामुळे हेन्री आता यापुढे सुपरमॅन अवतारात झळकणार नाही अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्वत: हेन्री केव्हील याने सांगितले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुपरमॅनला मी इतक्या लवकर सोडणार नाही असे हेन्रीने सांगितले. “सुपरमॅन ही माझी आजवरची सर्वात आवडती व्यक्तिरेखा आहे. अनेक ऑडिशन दिल्यानंतर सुपरमॅन अवतारात झळकण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे इतक्या लवकर सुपरमॅनच्या शक्ती संपणार नाहीत याची मी काळजी घेईन. अर्थात मार्व्हल सुपरहिरोंच्या तुलनेत सध्या डीसी सुपरहिरो काहीसे मागे पडले आहेत. परंतु सुपरमॅन लवकरच सर्व शक्तीनिशी पुनरागम करेल.” असे हेन्री केव्हील म्हणाला.

‘सुपरमॅन’ ही सुपरहिरो जगातील आजवरची सर्वात यशस्वी व्यक्तिरेखा आहे. १९३८ साली जेरी सिगल आणि जो शुस्टर या दोघांनी मिळून ‘डीसी’ कॉमिक्ससाठी ‘सुपरमॅन’ ही व्यक्तिरेखा तयार केली. हवेत उडणारा हा सुपरमॅन निळ्या रंगाचे कपडे आणि त्यावर लाल रंगाची चड्डी घातलेला पोशाख परिधान करतो. तो डोळ्यातून लेझर बिन सोडतो, तोंडातून वादळ निर्माण करतो, एक्सरे व्हिजनच्या मदतीने भिंतीच्या पलीकडे पाहू शकतो. या शक्तींमुळे तो मोठमोठय़ा खलनायकांना चुटकीसरशी हरवतो. अन्यायाविरुद्ध लढणारा सुपरमॅन म्हणजे हिंमत आणि प्रेरणेचे प्रतीक होय. असा हा सर्वाचा लाडका सुपरहिरो केवळ कॉमिक्ससाठी तयार करण्यात आलेली एक काल्पनिक व्यक्तिरेखाच नाही तर आपल्यापैकी अनेकांचे बालपण आहे.