26 May 2020

News Flash

हिरकणी..

‘हिरकणी’चा इतिहास आता मराठी चित्रपटांच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून फक्त वारा वर येतो आणि पाणी खाली जातं.. परंतु याला अपवाद ठरली ती हिरकणी. शालेय जीवनात पाठय़पुस्तकातून ऐकलेली, वाचलेली हिरकणी सगळ्यांनाच ज्ञात आहे. दुर्दैवाने त्या हिरकणीची कथा आणि व्यथा आजवर फक्त पुस्तकापुरतीच मर्यादित राहिली. याच ‘हिरकणी’चा इतिहास आता मराठी चित्रपटांच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. चिन्मय मांडलेकर लिखित, प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा चित्रपट येत्या २४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. आतापर्यंत गाजलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर अनेक चित्रपट आले, परंतु इतिहासात घडून गेलेल्या एका सामान्य स्त्रीची कथा रेखाटणारा हा पहिलाच चित्रपट असावा, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या चित्रपटानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक चिन्मय मांडलेकर आणि हिरकणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली.

आजवर केलेल्या कामांमध्ये सातत्याने नवं काहीतरी करू पाहणारा दिग्दर्शक प्रसाद ओक ‘हिरकणी’ चित्रपटाच्या निवडीविषयी सांगतो, आजवर अनेक बरे-वाईट चित्रपट के ले, परंतु कधीच एकसारखा आशय सातत्याने पुढे येऊ  दिला नाही. आपली शेवटची कलाकृती काय यापेक्षा येणारी कलाकृती कशी असेल, याकडे माझा कल असल्याने नव्या आशयाच्या शोधात होतो. ‘कच्चा लिंबू’ या माझ्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी अधिकच वाढली होती. या विचारात असतानाच सोनालीकडून ही संकल्पना समोर आली. चिन्मयचे लेखन आणि मी हे समीकरण मालिकांपासून सुरू असल्याने याही चित्रपटाचे लेखन त्यानेच केले. आणि यातूनच हिरकणी साकारली गेली, असं तो सांगतो.

चित्रपटाच्या लेखनाविषयी चिन्मय मांडलेकर सांगतो, पाठय़पुस्तकातून ऐकलेल्या, वाचलेल्या कवितेपलीकडे जाऊन हिरकणीचा शोध घेणे हे आव्हान होते. कारण आपल्याला दिसलेल्या हिरकणीला असलेले कुटुंब, घरदार, तिचा स्वभाव, महाराजांप्रति असलेले तिचे भाव या कोणत्याच गोष्टी परिचित नव्हत्या. तिला बुरूज उतरताना आलेल्या अडचणी काय होत्या त्या समजून घेण्यात आल्या. प्रताप गंगावणे यांनी चित्रपटाची कथा लिहिली. चित्रपट लिहिताना केवळ हिरकणीचा विचार न करता तिच्याभोवती असणाऱ्या संपूर्ण कौटुंबिक परिघाचा विचार करून तो लिहिण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हिरकणी पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल, असे चिन्मयने सांगितले.

प्रत्येक चित्रपटातून एक नवं रूप साकारणारी सोनाली या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिका परस्परविरोधी असल्या तरी ती एका स्त्रीचीच रूपं होती हे विसरून चालणार नाही. मग आरसपानी  सौंदर्य असणारी तमाशातली मुलगी असो, गृहिणी असो वा इतिहासकालीन हिरकणी. कोणत्याच भूमिकेची तुलना एकमेकांशी करता येत नाही. मात्र हिरकणी साकारताना व्यक्तिरेखा हिरकणीची असली तरी तिच्यातली ‘आई’ ही तिची मूळ भूमिका होती. आणि स्वत: आई नसताना चित्रपटात मातृत्वाची भावना निर्माण करणे अधिक आव्हानात्मक होते, असे सोनालीने सांगितले. परंतु आपली आई आपल्यासाठी हिरकणीचीच भूमिका पार पाडत असते. त्यामुळे तिच्याकडून आलेल्या संवेदना या सोबत होत्याच. शिवाय प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये हिरकणीचे असलेले स्थानच मला भूमिकेसाठी प्रेरणा देऊन गेले, असे तिने सांगितले. चित्रीकरणादरम्यान घडलेल्या किस्स्यांविषयी ती सांगते, बाळ सांभाळण्याची सवय नसल्याने सुरुवातीला बराच वेळ त्या बाळासोबत घालवला. त्यालाही माझ्या स्पर्शाची सवय होणे तितकेच गरजेचे होते. त्याच्या प्रत्येक हालचाली माझ्यासाठी नव्या होत्या. परंतु त्या बाळानेही चित्रीकरणात उत्तम साथ दिली. आई होण्यासाठी कोणत्याच प्रशिक्षणाची गरज नसते, ते मातृत्व आपसूकच आपल्यात रुजत जाते हे मात्र या प्रवासात प्रकर्षांने जाणवल्याचेही सोनालीने सांगितले.

चित्रपटात हिरकणीच्या पतीची म्हणजेच जिवाची प्रेक्षकांना नव्याने ओळख होणार आहे. या व्यक्तिरेखेविषयी फारसे कुणाला ठाऊक नसल्याने ही भूमिका पहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. जिवाची भूमिका साकारलेला अभिनेता अमित खेडेकर सांगतो, ऐतिहासिक भूमिकांवर कायमच मी प्रेम करत आलो आहे. त्यात माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच माझ्या वाटय़ाला अशी ऐतिहासिक भूमिका येणे हे मी माझे भाग्य समजतो. मला ही भूमिका साकारायची आहे हे कळल्यापासून प्रचंड दडपण जाणवत होते, परंतु प्रसाद ओक यांच्या दिग्दर्शनातून भूमिका सहज होत गेली. भाषेवर मात्र विशेष मेहनत करावी लागली. मावळ मराठी बोली आत्मसात करून त्यात गोडवा आणण्यासाठी बरेच दिवस गेले. सोनालीही याबाबत सांगते, भाषा आत्मसात करण्यासाठी फक्त वर्षभर या संहितेचे वाचन सुरू होते. अगदी वेशभूषा करूनही अनेकदा वाचन करून पहिले. पुढे एक वेळ अशी आली की संहिता आम्हाला तोंडपाठ झाली होती. भाषाच नव्हे, तर शेण सारवणे, गाईचे दूध काढणे अशा सर्वच गोष्टी सहज जमण्यासाठी सराव करावा लागला. सिनेमागची पूर्वतयारी तगडी असल्याने केवळ ३२ दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. आणि त्यामागे दिग्दर्शकाचे खरे श्रेय आहे, असे सोनाली आणि अमित या दोघांनीही सांगितले.

हिरकणी साकारताना सोनालीला स्वत:त अनेक बदल करावे लागले. मराठी भाषा अवगत असली तरी मावळभाषा शिकून ती सहज मुखोद्गत होणे गरजेचे होते, त्यामुळे भाषा शिकण्यापासून सुरुवात होती. हिरकणीची देहबोली, पेहराव, गवळणीचा वावर, चुलीवरचा स्वयंपाक आणि त्या काळात तिच्यात असलेली निरागसता हे अभिनयातून प्रेक्षकांपुढे मांडणे महत्त्वाचे होते. अशा वेळी आपल्याला जे येतं ते विसरून नवीन काहीतरी शिकण्याची आपली तयारी हवी, असे सोनाली सांगते.

सोनालीच्या आजवरच्या प्रवासाविषयी बोलताना, अभिनय क्षेत्रात यायचंच हा निश्चय पक्का होता, परंतु कुठून सुरुवात करावी हे मात्र माहिती नव्हते, असे तिने सांगितले. पुण्यात असताना एका मालिकेच्या ऑडिशनला गेले आणि ‘हा खेळ संचिताचा’ या पहिल्या मालिकेतून माझ्या वाटचालीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मला भाषेचे आणि अभिनयाचे जे धडे दिले ती शिदोरी आजही माझ्या सोबत आहे, असे ती म्हणते.

हिरकणी आणि तिचा पराक्रम पाहिलेला रायगड हा या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. या चित्रपटासाठी अनेकदा रायगडावर जाणे झाले. तिथले बारकावे, तिथले कडे सगळे बारकाईने टिपत गेलो. रायगडावर चित्रीकरण करण्यासाठी तो आपल्याला परिचित व्हायला हवा. प्रत्येकाला विषयाचे गांभीर्य कळावे यासाठी पावसाळ्याच्या दिवसात मावळतीला सोनालीसहित आम्ही सर्व जण हिरकणी बुरुजावर उतरलो, असं प्रसादने सांगितलं. हिरकणीने केलेला संघर्ष आपण अनुभवू शकत नाही, परंतु त्याची जाणीव निर्माण झाली. सलग चार दिवस रायगडावर चित्रीकरण सुरू होते. चित्रीकरणाचे मोठाले साहित्य, यंत्र साडेसातशे पायऱ्या चढउतार करून गडावर ने-आण करण्याचे काम माझ्या दीडशेहून अधिक सहकाऱ्यांनी केले. हा अनुभव सगळ्यांसाठीच कायम स्मरणीय राहील, असेही तो म्हणाला. चित्रपटाच्या निर्मितीबाबत प्रसाद आवर्जून चित्रपटाचे निर्माते राजेश मापुस्कर यांचा उल्लेख करतो. ते स्वत: उत्तम दिग्दर्शक असल्याने त्यांना या चित्रपटाचे मर्म अधिक जवळून जाणता आले, असे तो म्हणतो.

‘मराठीचा आग्रह हवा..’

या चित्रपटानिमित्ताने बोलताना मराठी भाषेचा मुद्दाही चिन्मयने मांडला. राजकीय पक्षांच्या भूमिका काहीही असल्या तरी आपला मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सशक्त असायला हवा. आपणच आपल्या मुलांसोबत हिंदी-इंग्रजीत संवाद साधला तर मराठीचा लळा त्यांच्या ठायी कसा निर्माण होणार?, असा प्रश्न चिन्मय मांडतो. भारतातले इतर भाषिक कुठेही भेटले तरी मातृभाषेत संवाद साधतात, पण मराठी माणसाचे नेमके उलटे आहे. घराघरांतील ही परिस्थिती आधी बदलायला हवी, असे त्याने आवर्जून सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:31 am

Web Title: hirkani marathi movie team interview sonalee kulkarni prasad oak chinmay mandlekar abn 97
Next Stories
1 चित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’
2 पाप्याच्या पितराचा पवित्रा..
3 वेबवाला : रटाळ आणि बाळबोध
Just Now!
X