लोकप्रिय कार्टून ‘बॉब द बिल्डर’ साऱ्यांनाच ठावूक असेल. आज जी तरुण मंडळी आहेत, त्यांच्यातील प्रत्येकाने लहानपणी हे कार्टून नक्कीच पाहिलं असेल. बॉब आणि त्याच्या मशीन्स, ट्रॅक्टर यांची उत्तमरित्या कथा या कार्टूनमध्ये मांडण्यात आल्यामुळे हे कार्टून आज अनेकांच्या मनात घर करुन आहे. मात्र या कार्टूनच्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. कार्टूनमध्ये बॉब या कॅरेक्टरला आवाज देणाऱ्या विलियम डफ्रिस यांचं निधन झालं आहे. त्यामुळे बॉबचा खरा आवाज हरपला आहे.

‘बॉब द बिल्डर..करके दिखाएंगे..बॉब द बिल्डर. हा भाई हा..’ हे शब्द कानावर पडल्यानंतर लहान मुलांची पावलं आपोआप टिव्हीच्या दिशेने वळायची. या कार्टूनमधील मुख्य भूमिकेत असलेल्या बॉब या पात्राला विलियम डफ्रिस यांनी आवाज दिला होता. मात्र वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या कित्येक दिवसापासून डफ्रिस कर्करोगाने त्रस्त होते. अखेर याच कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. पॉकेट युनिव्हर्स प्रोडक्शन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डफ्रिस यांच्या निधनाची माहिती दिली.

 ‘खरं तर ही गोष्ट सांगताना अत्यंत दु:ख होतंय. पॉकेट युनिव्हर्स प्रोडक्शनचे सह-संस्थापक आणि इसी कॉमिक्सद्वारे केलेला शो ‘द वोल्ट ऑफ हॉरर’चे दिग्दर्शक विलियम डफ्रिस यांचं कर्करोगामुळे निधन झालं आहे’, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली. विलियम यांनी यूएस आणि कॅनडामध्ये ‘बॉब द बिल्डर’च्या सीजनसाठी त्यांचा आवाज दिला होता. तसंच त्यांनी ‘स्पायडर मॅन’मध्ये पीटर पारकर ही भूमिकादेखील वठविली होती.