‘ द डर्टी पिक्चर’मुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री विद्या बालन आता बॉलीवूडची आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री असली तरी काही वर्षांपूर्वी तिला अपशकुनी मानण्यात येत होते. माझे चित्रपट फारसे चालत नसल्याने बॉलीवूड मला अपशकुनी मानत होते, असे विद्या बालन हिनेच एका जाहीर समारंभात बोलताना सांगितले.
विविध प्रकारच्या भूमिका करणाऱ्या विद्या बालन हिचे आत्तापर्यंत ‘शादी के साईड इफेक्ट’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘घनचक्कर’, ‘पा’, ‘इश्किया’, ‘भूलभुलय्या’ ‘लगे रहो मुन्नाभाई’ असे चित्रपट गाजले. पण ‘द डर्टी पिक्चर’विशेष गाजला. ‘हमारी अधुरी कहानी’ या तिच्या आगामी चित्रपटाची बॉलीवूडमध्ये चर्चा आहे.
करिअरच्या सुरुवातीला माझे चित्रपट शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नव्हते. काही चित्रपटातून भूमिकाही केल्या होत्या, पण ते फारसे चालले नाहीत. एका मल्याळम चित्रपटात मला घेण्यात आले पण तो चित्रपट मधेच बंद पडला. त्यानंतर माझ्याकडे आणखी तीन चित्रपट आले पण तेही पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे बॉलीवूड मला अपशकुनी मानयला लागले होते. मात्र ‘परिणिता’ चित्रपटाने समीकरणे बदलली गेली. चित्रपटातील कामामुळे मी खूप समाधानी आणि आनंदी होते. या चित्रपटाने माझी बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली. मी चित्रपटात काम करावे, अशी माझी घरच्यांची अजिबात इच्छा नव्हती. फक्त एका चित्रपटात काम करण्याच्या अटीवर माझ्या कुटुंबीयांनी मला चित्रपटसृष्टीत जायची परवानगी दिली होती.
मीही तसेच ठरविले होते. पण चित्रपटसृष्टीत मला यश मिळाले, चित्रपटातील माझ्या भूमिका प्रेक्षकांना आवडू लागल्या, चित्रपट गाजले. तेव्हा मी आणि माझ्या घरच्यांनीही विचार बदलला आणि बॉलीवूडमध्ये काम करण्याचे ठरविले, असेही विद्या बालनचे म्हणणे आहे.विद्या बालन सध्या ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात विद्या बालनसह इरफान हाश्मी, राजकुमार राव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.