अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. यातच दिवंगत अभिनेता इंदर कुमार यांच्या पत्नीने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि शाहरुख खानवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. इंदर कुमारच्या पत्नीने पल्लवी कुमारने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत हे आरोप केले आहेत.

“मला चांगलं आठवतंय, त्यांच्या निधनापूर्वी ते बॉलिवूडमधील दोन दिग्गज व्यक्तींकडे मदत मागण्यासाठी गेले होते. उदरनिर्वाह व्हावा म्हणून ते लहान-मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करतच होते. मात्र त्यांना एका मोठ्या चित्रपटाचा भाग व्हायचं होतं. जशी त्यांनी करिअरची सुरुवात केली होती तसंच. त्यावेळी ते करण जोहरकडे गेले होते, तेव्हा मी सुद्धा त्यांच्यासोबत होते. हा प्रसंग माझ्या डोळ्यादेखत झाला होता. त्यांनी जवळपास २ तास आम्हाला त्यांच्या गाडीच्या बाहेर वाट पाहत ठेवलं होतं. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मॅनेजरने येऊन करण जोहर सध्या कामात आहेत, असं सांगितलं.मात्र तरीदेखील आम्ही त्यांची वाट पाहत होतो त्यानंतर करण बाहेर आला आणि इंदर गरिमाच्या संपर्कात रहा. पण सध्यातरी तुझ्यासाठी कोणतंच काम नाही, असं करणने आम्हाला सांगितलं”, असं पल्लवीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, “इंदरनेदेखील वाट पाहिली. त्यानंतर त्याने १५ दिवसानंतर परत करण जोहरला फोन केला. मात्र तेव्हा सुद्धा तुझ्यासाठी काही काम नाही असं म्हणून त्याने इंदरचा नंबर ब्लॉक करुन टाकला. या घटनेनंतर इंदर आणि शाहरुख खानची झिरोच्या सेटवर भेट झाली, तेव्हा शाहरुखने इंदरला एक आठवडा वाट पाहण्यास सांगितलं. सध्या काही काम नाही परंतु माझ्या मॅनेजरच्या संपर्कात रहा असं त्यांनी सांगितलं. या दोन मोठ्या निर्मिती संस्थांकडे कोणतंच काम नव्हतं यावर कोणी विश्वास ठेऊ शकेल? करण जोहरने तर अनेक वेळा सांगितलं की तो स्टार्ससोबत काम करतो. पण जाऊदेत माझा नवरा स्टार होता, आजही लोक त्याला त्याच्या कामामुळे ओळखतात”.

दरम्यान, पल्लवीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चिली जात आहे. इंदर कुमार हे कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता होते .१९९६ साली त्यांनी मासूम चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘वॉन्टेड’, ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र २०१७ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं.