चित्रपटांच्या प्रमोशनद्वारे भारतीय रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. त्यानुसार, आता निर्मात्यांना आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे. या योजनेला ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ असे संबोधण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जाहिरातीच्या माध्यमांतून कला, संस्कृती, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, खेळ इत्यादींच्या प्रचारासाठी विशेष ट्रेन्स उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याची सुरुवात अक्षयकुमार अभिनित हाऊसफुल-४ या चित्रपटापासून करण्यात आली आहे.

आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेद्वारे सुरु करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत पहिली विशेष ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ ही ट्रेन हाऊसफुल-४ चित्रपटाची टीम आणि माध्यम प्रतिनिधींना घेऊन बुधवारी मुंबई सेन्ट्रल येथून निघणार असून गुरुवारी नवी दिल्ली येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण ८ डब्बे असतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांच्या माहितीनुसार, “ही विशेष रेल्वे गाडी सूरत, वडोदरा, कोटा या महत्वाच्या जिल्ह्यांसह विविध राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे.” रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, “या योजनेंतर्गत रेल्वेने ज्यांचे नवे चित्रपट येत आहेत अशा अनेक प्रॉडक्शन हाऊससोबत संपर्क देखील केला आहे. या योजनेची जबाबदारी आयआरसीटीसीवर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी देखील रेल्वेने वेळोवेळी अनेक योजनांवर आपली स्थानकं आणि गाड्यांच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी काम केले आहे.