‘ सन ऑफ सरदार’ या चित्रपटाचे ‘ बिग बॉस ६’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रमोशन करताना शीख धार्मिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे ‘ सन ऑफ सरदार’चे कलाकार व ‘ बिग बॉस’ वर इंदौर येथील एका स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. गंगादिप सिंग या स्थानिक रहिवाशाने दाखल केलेल्या या याचिकेवर आशुतोष शुक्ला यांच्या खंडपीठाने २१ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.
कलर्स वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘ बिग बॉस ६’ च्या एका भागात माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने या शोमधील महिलांना पगडी बांधली होती. शीख धर्मात महिला पगडी बांधत नसल्यामुळे शीख धार्मिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे शीखांनी ‘ बिग बॉस ६’चा सूत्रसंचालक सलमान खान, सिद्धू, तसेच ‘सन ऑफ सरदार’चे कलाकार अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा यांच्यावर ‘ धार्मिक भावना दुखावल्या’ बद्दलची याचिका दाखल केली होती.