काही कलाकारांची ओळख करून द्यायची असेल तर त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. कोणी बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार असतो तर कोणी सिनेमांचा शहेनशहा असतो. कोणी रुपेरी पडद्यावरचा पहिला चॉकलेट बॉय असतो तर कोणी अजून काही. पण या सगळ्यात काही कलाकार असेही असतात ज्यांची ओळख देण्यासाठी त्यांचं फक्त नावच पुरेसं असतं. बॉलिवूडचा एकमेव खलनायक ज्याच्या नावावरच सिनेमांची तिकीटं विकली जायची, तो खलनायक म्हणजे प्राण.

प्राण यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत अधिकतर खलनायकांच्याच व्यक्तिरेखा साकारल्या. पण तुम्हाला माहित आहे का की त्यांचा एका सिनेमातला गेटअप हा दुसऱ्या सिनेमामध्ये पूर्णपणे वेगळा असायचा. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही एकच गेटअप दुसऱ्यांदा केला नाही. प्राण यांच्या एकच गेटअप, हेअर स्टाइल न ठेवण्याच्या स्टाइलची कॉपी नंतर गुलशन ग्रोवर यांनी केली.

दिल्लीच्या जंतर मंतरवर झाली स्वामी ओमची धुलाई

भारतीय सिनेजगतातला हा एक असा अभिनेता होता, ज्याचं नाव एकदा का कास्टिंगमध्ये जोडलं गेलं की त्याहून जास्त काही लिहावंच लागायचं नाही. ‘जंजीर’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता पण तेव्हा कोणताच डिस्ट्रीब्युटर सिनेमा विकत घ्यायला तयार नव्हता. अमिताभ बच्चन या सिनेमात नवखे असल्यामुळे नवीन मुलावर पैसे गुंतवायला कोणीही तयार नव्हते. यावेळी दिग्दर्शकांनी सिनेमाचा मुख्य अभिनेता प्राण असल्याचे सांगायला सुरुवात केली आणि डिस्ट्रीब्युटर्सनी हा सिनेमा लगेच विकत घ्यायला सुरूवात केली. त्यांच्या नावाचा दबदबा एवढा होता की तेव्हा निर्माते मुख्य अभिनेत्यापेक्षाही त्यांना जास्त मानधन द्यायचे. सिनेसृष्टीत फक्त राजेश खन्ना हे एकमेव अभिनेते होते ज्यांचे मानधन प्राण यांच्याहून जास्त होते.

pran-3

आजही कोणा बॉलिवूड चाहत्याला सिनेसृष्टीतला सर्वात प्रसिद्ध खलनायक कोण असा प्रश्न विचारला तर तो प्राण यांचेच नाव घेईल. प्राण यांनी त्यांच्या ‘यमला जट’ या पहिल्या सिनेमापासूनच खलनायकी भूमिका करायला सुरुवात केली. तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘प्राण’ म्हणून मिरवणाऱ्या या अभिनेत्याला २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार, राज कपूर पुरस्कार असे कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. भारतीय चित्रपटसृष्टी शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करत असतानाच प्राण यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’सारख्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जावे, हाही एक छान योगायोग होता.

pran-2

१२ फेब्रुवारी १९२० मध्ये जुन्या दिल्लीतील कोटगड येथे एका श्रीमंत पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या प्राण यांचे आयुष्यही तितक्याच नाट्यमय घटनांनी भरलेले होते. लाहोरमध्ये चित्रपट लेखक वाली मोहम्मद यांच्या ओळखीतून पंजाबी चित्रपट निर्माते दलसुख पांचोली यांच्या ‘यमला जट’ सिनेमात त्यांना पहिली भूमिका मिळाली. त्यानंतर १९४२ ते १९४६ पर्यंत तब्बल २२ सिनेमांमधून प्राण यांनी काम केले होते. पण, त्यांची ही कारकिर्द बहरली होती ती लाहोरमध्ये. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे त्यांच्या या बहरत्या कारकिर्दीला जोरदार धक्का बसला. त्यानंतर प्राण यांनी मुंबई गाठली.

रंगभूमी हीच आई आणि पहिलं प्रेम- मयुरेश पेम

मुंबईत आल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांना नाटककार सआदत हसन मंटो यांच्यामुळे त्यांना देव आनंद आणि कामिन कौशल यांची मुख्य भूमिका असलेला बॉम्बे टॉकीजचा ‘जिद्दी’ सिनेमा त्यांना मिळाला. प्राण यांच्या ५७ वर्षांच्या लांबलचक कारकिर्दीत त्यांनी ३५० चित्रपटांमधून काम केले. अशा या हरहुन्नरी कलावंताने १२ जुलै २०१३ मध्ये जगाचा निरोप घेतला आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे जणू ‘प्राण’ निघून गेले.