निकृष्ट दर्जाच्या शेव्हिंग क्रीमची जाहिरात करून ती सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. विशेष न्यायाधीश काशिनाथ सिंह यांनी सोमवारी शाहरुखसह चार जणांना नोटीस पाठवून २६ ऑगस्टला न्यायालयात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे शाहरुखला कोर्टाची नोटीस

राजकुमार पांडे नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. ‘शाहरुख खानने एका शेव्हिंग क्रीमची जाहिरात करत, ही देशातील अव्वल क्रमांकाची क्रीम असल्याचं त्याने यात सांगितलं आहे. पण वास्तविकतः हे सत्य नसून, शाहरुख लोकांची दिशाभूल करत आहे,’ असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

‘हे क्रीम लावल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पुरळ आले. सरकारी रुग्णालयात त्यावर उपचार केले. हे क्रीम मध्य प्रदेश अन्न आणि औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवले असता तपासणीत हे क्रीम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले,’ असं राजकुमार पांडे यांनी याचिकेत सांगितलं. पांडे पुढे म्हणाले की, ‘तपासणीचा अहवाल मी याआधीच न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयाने शाहरुख खान, मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे नियंत्रक, स्थानिक दुकानाचे मालक आणि शेव्हिंग क्रीम कंपनीच्या मालकांना नोटिस पाठवली आहे.’

दरम्यान, शाहरुख सध्या ‘हॅरी मेट सेजल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. वेगवेगळ्या राज्यांत जाऊन तो सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतो. नुकताच तो, अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक इम्तियाज अली सिनेमाच्या प्रमोशनसाठी बनारसला गेले होते. बनारसमध्ये शाहरुखनने अनुष्कासाठी खास ‘लॉलीपॉप लागेलू’ गाणं म्हटलं.

‘बाहुबली’मुळे राणा डग्गुबतीचा हॉलिवूडमध्ये वाढला भाव

४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि अनुष्का या दोघांचा हा एकत्र तिसरा सिनेमा आहे. याआधी ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले. हे दोघंही पहिल्यांदाच इम्तियाज अलीसोबत काम करत आहेत.