छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो ‘बिग बॉस १४’ सध्या चर्चेत आहे. नुकताच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडला आहे. बाहेर येताच त्याने एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

जानने घरातून बाहेर पडताच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने वडिलांनी जे वक्तव्य केले त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही तीन भाऊ आणि आम्हा तिघांनाही आई रीटा भट्टाचार्यने लहानाचे मोठे केले आहे. माझे वडिल कधीही आमच्या आयुष्याचे भाग झाले नाहीत. एक गायक म्हणून त्यांनी कधीही मला प्रोमोट केले नाही किंवा पाठिंबा दिला नाही. या मागचे कारण त्यांनाच विचारा. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे घटस्फोट झाले आहेत आणि त्यांनी पुन्हा लग्न केले आहेत. भलेही ते त्यांच्या पूर्व पत्नीशी बोलत नसतील परंतू त्यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी घेण्यास लाज बाळगली नाही. पण माझ्या बाबतीत असे झाले नाही’ असे जान म्हणाला.

पुढे तो म्हणाली, ‘त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या आईने मला कशी शिकवण दिली यावर प्रश्न उपस्थित करत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला त्यामध्ये मला पाठिंबा दिला होता. मी हे दोन्ही व्हिडीओ पाहिलेले नाहीत. पण मला असे वाटते की माझ्या संगोपनाबाबत कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण सर्वांनी मला शोमध्ये पाहिले आहे आणि माझे कौतुक देखील केले आहे.’

काय म्हणाले होते कुमार सानू?

‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेची चीड येते, असं विधान केल्यामुळे जान सानूवर टीका केली जात होती. याप्रकरणी कुमार सानू यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली आहे. ‘गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलांच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असे ते म्हणाले होते.