अप्रतिम अभिनय तसेच कथेतील वेगळी वळणे या सर्वांमुळे २००२ साली प्रदर्शित झालेला ‘आँखे’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. आता चित्रपट निर्माते या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं समोर आलं आहे. या सीक्वेलच नाव ‘आँखे-२’ असणार आहे. तसेच चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चाही सुरु आहे.

‘आँखे-२’ चित्रपटात एकूण पाच मोठे कलाकार असणार आहेत. या पाच मोठ्या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश असणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच ‘आँखे’ चित्रपटातील महत्वाचे अभिनेते परेश रावल हे देखील या सीक्वेल मध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दिग्दर्शक अनिस बझ्मी ‘आँखे-२’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या ते ‘पागलपंती’ चित्रपटच्या शुटिंगसाठी लंडनला रवाना झाले आहेत. लंडनला जाण्यापूर्वी त्यांनी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला भूमिकेबद्दल विचारलं आहे. ‘पागलपंती’ चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर अनिल बझ्मी ‘आँखे-२’ चित्रपटाला सुरुवात करणार आहेत.

‘चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट निश्चित झाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चित्रपटासाठी त्यांचा होकारही कळवला आहे. आम्ही लवकरच आँखे २ च्या कलाकारांची यादी जाहीर करु’ असं अनिस यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चित्रपट निर्माते करण जोहरच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट २०११मधील अमेरिकन चित्रपटाचा रिमेक असणार आहे. तर दुसरीकडे बिग बी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत.