तालिबानच्या मुद्द्यावरून जगभरात राजकारण तापतंय. बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत तालिबानचं समर्थन करणाऱ्या मुस्लीमांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता लोकप्रिय गीतकार आणि लेखन जावेद अख्तर यांनी तालिबानान्यां समर्थन देणाऱ्यांवर मत मांडलं आहे. तालिबानचं कृत्य रानटी असून नक्कीच ते निंदनीय आहे असं ते म्हणाले आहेत. नुकत्याच एनडी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी तालिबानचं समर्थन करणाऱ्यांवर परखड मत मांडलं आहे. यावेळी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलंय.

देशातील अवघे काही मुस्लीमच तालिबानच समर्थन करत असल्याचं ते म्हणाले आहेत. समर्थन करणाऱ्यांबद्दल ते म्हणाले, “मला त्यांची वक्तव्य लक्षात नाही मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचं त्यांनी समर्थन केलंय. पण समर्थन करणारे हे देशातील काही मोजकेच मुसलमान आहेत. मी ज्या अनेक मुस्लीमांशी बोललो त्यांना समर्थन करणाऱ्यांची वक्तव्य ऐकून धक्काच बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लीमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत चांगलं शिक्षण मिळावसं वाटतं. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे या पुरोगामी विचारांचं समर्थन करत आहेत. जिथे स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो अशा पुरोगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.”

RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे सारखेच

मात्र हे लोक मूठभर असल्याने त्यांना जे हवं ते बोलू द्यावं यातून ते काहीही साध्य करू शकणार नाहीत असं जावेद अख्तर या मुलाखतीत म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, “जगभरतील उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राज्य हवे आहे, त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिदू राष्ट्र हवं आहे. हे सर्व एकाच विचारसणीचे आहेत. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो.” पुढे जावेद अख्तर म्हणाले, ” निश्चितच तालिबानी रानटी आहेत मात्र जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देत आहेत ते देखील अशाच मानसिकतेचे आहेत.” असं जावेद अख्तर म्हणाले.

हे देखील वाचा: तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी झापलं, म्हणाले…

भारत कधी तालिबानी देश बनू शकत नाही

हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे तालिबान्यांच्या विचारसणीचा भारतीयांवर प्रभाव पडणार नाही. भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही असं जावेद अख्तर म्हणाले आहेत. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये एका आठवड्यामध्ये उद्रेक करत सत्ता मिळवली ते पाहता हे पूर्व नियोजित असल्यासारखं वाटतंय. अमेरिका सरकार आणि तालिबान यांचा डाव असल्याचं हे वाटत आहे.” असं ही ते म्हणाले.