सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटनांवर भाष्य करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे दिल्ली दंगलीनंतर चर्चेत आले आहेत. दिल्लीत उसळलेल्या दंगलीत आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात ‘आप’चे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जावेद अख्तर यांनी ताहिर हुसेन यांच्यावरील कारवाईविषयी ट्विट करत त्यांचं मत मांडलं. मात्र त्यांच्या या ट्विटवर नेटकरी संतापले आणि त्यांनी अख्तर यांना ट्रोल केलं.

अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ताहिर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. जावेद अख्तर यांनीही ट्विट करून स्वतःची भूमिका मांडली. फक्त ताहिर हुसेनचं का? असा प्रश्न अख्तर यांनी ट्विट करुन उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे. नेटकऱ्यांचा रोष ओढवल्यानंतर जावेद अख्तर यांनी आणखी एक ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

“मला चुकीचं समजणं सोपं आहे. फक्त ताहिरचं का? असा प्रश्न मी विचारला नसून केवळ ताहिरच का? ज्यांनी पोलिसांसमोर हिंसाचार करण्याची धमकी दिली. त्यांच्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. त्याच्यावर अद्याप खटला दाखल झालेला नाही, असं माझं म्हणणं होतं,”असं जावेद अख्तर म्हणाले.

वाचा :  जावेद अख्तर यांची कपिल मिश्रांवर सडकून टीका, म्हणाले…

दरम्यान, आयबी कर्मचारी अंकित शर्मा (२६) हे मंगळवारपासून बेपत्ता होते आणि त्यांचा मृतदेह बुधवारी दंगल उसळेल्या चांद बाग परिसरातील गटारीमध्ये आढळला होता. शर्मा यांच्या हत्येत ताहिर हुसेन आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी शर्मा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून ताहिर हुसेनविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.