जितेंद्र जोशी म्हणजे त्याच्या चाहत्यांचा लाडका जितू याने करोना व्हायरसशी लढा देणाऱ्या पोलिसांसाठी एक रॅप साँग गायलं आहे. हे रॅप साँग सोशल मीडियावर सध्या ट्रेण्ड होत आहे. जितेंद्र कविता लिहितो हे अनेकांना माहित असेलच. मात्र आता त्याने पोलिसांसाठी एक दमदार ‘रॅप’ लिहिलं आहे आणि म्हटलंसुद्धा आहे.
‘थोडी इज्जत दिखा, एक सॅल्यूट तो मार…’ असं तो या रॅपमध्ये म्हणतोय. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पोलीस इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. कामावर असताना त्यांनाही करोना व्हायरसची लागण होण्याचा धोका सतत आहे. अशा वेळी त्यांचे आभार न मानता अनेकजण त्यांच्यावर हल्ला करत आहेत, दगडफेक करत आहेत. ‘पोलिसवाला भी है इन्सान, वो भी पडता है बिमार’ असं म्हणत जितूने या रॅप साँगमधून लोकांना चपराक लगावली आहे.
पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. लॉकडाउनमध्ये असताना विविध माध्यमांतून त्यांचे आभार मानले जात आहेत. जितूने रॅपच्या माध्यमातून पोलिसांना अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 3:03 pm