वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रासाठी ऑडिशन दिली. त्यात यशस्वी झाल्याने त्यांना अगदी लहान वयातच आकाशवाणीसाठी गायची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास आज ८५व्या वर्षांत येऊन पोहोचला आहे. मराठी भावसंगीतातील हे ‘जीवनगाणे’ आहे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांचे.

आजवर सुमारे शंभरहून अधिक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली असून २५ ते ३० गाण्यांना आवाज दिला आहे. ‘माती सांगे कुंभाराला’ किंवा ‘रात्र काळी घागर काळी’ ही त्यांनी गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटातील लोकप्रिय असलेल्या ‘गंगा आली रे अंगणी’ या गाण्यातही त्यांचा आवाज आहे.

Swargandharva Sudhir Phadke musical biopic trailer launch
राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
subodh bhave Sangeet Manapmaan movie first poster out
Video: सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर, म्हणाला, “मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार…”
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

पोवळे यांचे घराणे पनवेलजवळील चिरनेर या गावचे. त्यांचे वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार होते. आई पार्वतीबाई यांनाही गाण्याची आवड होती. त्यामुळे गाण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. पोवळे यांना नऊ भाऊ व दोन बहिणी. आपल्या गळ्यात गाणे आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती. या विषयीची आठवण सांगताना ते म्हणाले, मी पहिलीत होतो. शाळेच्या पाठय़पुस्तकात ‘आला बघ नंदीबैल, आई जाऊ दे सोड आता मज लवकर मौज पाहू दे’ ही कविता होती. एके दिवशी वर्गात मास्तरांनी ही कविता पाठ करून यायला सांगितले. मी पाठ केली. वर्गात पिंगळे मास्तर हं, तू म्हण रे, तू म्हण, असे त्यांना वाटेल त्या वेगवेगळ्या मुलांना सांगत होते. मी कविता म्हटली आणि मास्तर माझ्याकडे पाहातच राहिले. आमच्या शेजारीच राहणाऱ्या कुलकर्णी मास्तरांना त्यांनी माझ्या गाण्याबद्दल सांगितले. कुलकर्णी मास्तर घरी आले आणि त्यांनी घरी मी म्हटलेल्या कवितेविषयी सांगितले. त्यानंतर आईने मला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरविला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आई म्हणाली, गोविंदा, असाच गात राहा. त्या वेळी मला आपल्याला गाता येते याचा साक्षात्कार झाला.

आकाशवाणी केंद्रावर वयाच्या पंधराव्या वर्षी दिलेल्या ‘ऑडिशन’चा प्रसंग आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावर ते अर्धी चड्डी आणि शर्ट अशा वेशातच आले होते. योगायोगाने त्या दिवशी आकाशवाणीत ‘ऑडिशन’ सुरू होत्या. शाळकरी वयातील त्या मुलाला पाहून आकाशवाणी केंद्रावरील अधिकाऱ्यांना आश्चर्यच वाटले. पर्यवेक्षकांनी त्यांना फॉर्म भरलाय का? विचारल्यावर पोवळे यांनी नाही, म्हणताच पर्यवेक्षकांनी मग तुम्हाला ऑडिशन देता येणार नाही, असे सांगितले. त्यावर मी गावाहून आलो आहे, मला याची काही माहिती नव्हती, असे सांगून ऑडिशन घेण्याची विनंती पोवळे यांनी केली. तेव्हाचे कार्यक्रम अधिकारी डी. अमेल यांनी परवानगी दिल्यानंतर पोवळे यांनी ‘कशानं बाई काजळला गं हात’ हे गाणे म्हणायला सुरुवात केली. गाण्याच्या दोन ओळी म्हणून झाल्या आणि स्टुडिओतील ‘लाल दिवा’ अचानक बंद झाला. आपले गाणे चांगले झाले नसावे म्हणून पुढचे ऐकून न घेता हा दिवा बंद करून थांबण्याची सूचना दिली गेली असे त्यांना वाटले. हिरमुसले होऊन ते स्टुडिओच्या बाहेर आले तर पर्यवेक्षकांनी गाणे छान झाल्याचे सांगून शाबासकी दिली. पुढे पंधरा दिवसांनी ‘ऑडिशन’ पास झाल्याचे पत्रही त्यांना आले.

३० मार्च १९४८ या दिवशी आकाशवाणीसाठी त्यांना गायची संधी मिळाली. संध्याकाळी सव्वासात, रात्री सव्वाआठ आणि रात्री साडेनऊ वाजता त्यांनी गायलेल्या गाण्याचे थेट प्रसारण झाले. आकाशवाणीसाठी सुगम संगीत गाणारे ते सर्वात लहान वयाचे गायक ठरले. आकाशवाणीशी येथे त्यांचे सूर जुळले ते कायमचेच. पुढे अनेक वर्षे त्यांनी आकाशवाणीसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले.

आकाशवाणीसाठी संगीतबद्ध केलेल्या पहिल्या गाण्याविषयीची आठवण जागवताना ते म्हणाले, संगीतकार केशवराव भोळे यांनी मला बोलावणे पाठवले आणि कवी वा. रा. कांत यांची एक कविता मला दिली. त्याला चाल लावण्यास त्यांनी सांगितले. गंमत म्हणजे हेच गाणे माझ्याकडे चाल सुचत नाही म्हणून सहा महिने तसेच पडून होते. आकाशवाणीसाठी गाणे संगीतबद्ध करण्याची संधी मिळाली आणि मी जिद्दीने ते गाणे पुन्हा घेऊन बसलो व त्याला चाल लावली. ‘जीवलगा थांब, मोगरा फुले तोवर थांब’ हे ते गाणे होते. काही वर्षांनंतर संगीतकार यशवंत देव यांनी बोलावून घेतले आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आकाशवाणीसाठी श्रीरामावर तीन गाणी तयार करून देण्याची सूचना केली. इतक्या कमी वेळात जमेल का नाही, पण  प्रयत्न करतो अस देवांना सांगून पाहिले. त्यावर हे तू करू शकशील, असा आत्मविश्वास त्यांनी मला दिला. हातात वेळ फार कमी होता. मुंबईत माधवबागेत जाऊन रामावरील गाण्यांचे पुस्तक आणले. त्यातील तीन गाण्यांची निवड केली. दोन गाण्यांना अगदी सहजपणे चाल लावून झाली, पण तिसऱ्या गाण्याची चाल काही केल्या सुचेना. इकडे गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाचा दिवस उजाडला. आकाशवाणीच्या स्टुडिओत चाल लावलेल्या दोन गाण्यांचे ध्वनिमुद्रण झाले. तिसऱ्या गाण्याची चाल अजून तयार झाली नव्हती. मध्ये विश्रांतीच्या वेळेत मी स्टुडिओत बसलो. डोळ्यापुढे रामाची मूर्ती आणून त्या रामालाच साकडे घातले व रामराया आता तूच यातून काही मार्ग दाखव, अशी मनोमन प्रार्थना केली. जे होईल ते होईल असे म्हणून तिसऱ्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला सुरुवात करू या, म्हणून सांगितले आणि ते तिसरे ‘राम सर्वागी सावळा’ हे गाणे माझ्याकडून चालीसकट उत्स्फूर्तपणे तयार झाले. १९६४ च्या वर्षांतील त्या गुढीपाडव्याला मी गायलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणे मुंबईसह आकाशवाणीच्या नागपूर, गोवा, पुणे, रत्नागिरी आदी केंद्रांवरूनही प्रसारित झाले. हे गाणे रसिकांना खूप आवडले. काही वर्षांनी पुण्यात एका सोन्या-चांदीच्या दुकानात मी आणि पत्नी काही खरेदी करण्यासाठी गेलो होतो. खरेदीच्या पावतीवर माझे नाव टाकल्यानंतर अरे गोविंद पोवळे म्हणजे ‘राम सर्वागी सावळा’ गाणारे ना, अशी विचारणा मला केली. जवळपास चाळीस वर्षांनंतरही हे गाणे श्रोत्यांच्या स्मरणात आहे, हे पाहून मला आनंद झाला.

‘एचएमव्ही’ कंपनीसाठी पोवळे यांनी ‘उमटली रामाची पाऊले’ हे पहिले गाणे संगीतबद्ध केले. जानकी अय्यर यांनी गायलेले हे गाणे रसिकांच्या आजही ओठावर आहे. माणिक वर्मा यांनी गायलेले व पोवळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘पैंजण हरीचे वाजती’, सुमन कल्याणपूर यांनी गायलेले व पोवळे यांनीच संगीतबद्ध केलेले ‘कामधाम संसार विसरुनी हरी भजनी रंगली राधिका’ तसेच ‘माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेडय़ा माझ्या पायाशी’ (गीत-मधुकर जोशी आणि गायक व संगीतकार गोविंद पोवळे), ‘रात्र काळी घागर काळी’ (रचना-संत नामदेव आणि गायक गोविंद पोवळे व प्रभाकर नागवेकर), गंगा आली रे अंगणी (संगीत- दत्ता डावजेकर, चित्रपट-संथ वाहते कृष्णामाई) आदी गाणीही लोकप्रिय आहेत. दशरथ पुजारी, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही ते गायले आहेत. शास्त्रीय संगीताप्रमाणेच सुगम संगीताची परीक्षा सुरू करण्यात पोवळे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

पोवळे यांनी स्वत: गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या तसेच गजाननराव वाटवे यांनी गायलेल्या गाण्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात विविध ठिकाणी केले. जोपर्यंत आपले व्यवहार ‘रोबो’च्या हाती जाणार नाहीत आणि मानवी भावभावना राहतील तोपर्यंत सुगम संगीत टिकून राहील, फक्त त्याचे स्वरूप बदलेले असेल असे पोवळे सांगतात. आपण जे गातो ते ऐकणाऱ्याच्या मनात ठसावे आणि हृदयापर्यंत उतरावे, असा सल्लाही ते नवोदित गायकांना देतात. सुमारे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी त्यांच्याकडे सुगम संगीत शिकले असून अभिनेत्री सीमा देव, आशालता वाबगावकरही त्यांच्याकडे शिकल्या आहेत. पत्नी आणि तीन विवाहित कन्या, जावई, दोन पुत्र, सुना आणि नातवंडे यांच्या परिवारात ते आनंदात आणि समाधानात आहेत. सुयोग आणि सुरदास ही मुले संगीत क्षेत्रातच आहेत. आज रविवारी (३० ऑक्टोबर) रोजी त्यांनी ८५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे.

ज्याच्या गळ्यात गाणे

तो भाग्यवंत आहे

गातो अजून मी ही

म्हणूनी जीवंत आहे

गाईन रोज गाणे

गेलो जरी थकुनी

दारात थांबलेल्या सांगेन मृत्यूलाही

अरे तुझ्याबरोबर यायला कोणाला

उसंत आहे

गातो अजून मी ही

म्हणूनी जीवंत आहे..

अशी पोवळे यांची गाण्याबद्दलची भावना आहे. गाण्याबद्दलच्या या भावना व्यक्त करतच त्यांनी रंगलेल्या गप्पांचा समारोप केला.