कमल हसन यांचा वादग्रस्त ठरलेला चित्रपट ‘विश्वरूपम’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसन यांनी कोट्यवधी रुपये या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतवले होते. हसन यांनी मेजर विसाम अहमद काश्मिरीची मुख्य भूमिका साकारलेल्या ‘विश्वरुपम’वर मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूमध्ये बंदी घातली होती. दोन आठवडयांच्या विलंबानंतर ‘विश्वरुपम’ सर्व समस्यांतून बाहेर पडून प्रदर्शित झाला होता. आता त्याच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच ‘विश्वरूपम २’चा ट्रेलर येत्या ११ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत स्पेशल कनेक्शन आहे.
आमिर खान, ज्युनिअर एनटीआर आणि कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन मिळून ११ जून रोजी हा ट्रेलर लाँच करणार आहेत. ‘विश्वरूपम २’च्या हिंदी ट्रेलरचं प्रदर्शन आमिरच्या हस्ते तर तेलुगू आणि तामिळ ट्रेलरचं प्रदर्शन ज्युनिअर एनटीआर आणि श्रुती हसन यांच्या हस्ते होणार आहे. कमल हसन दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ आणि हिंदीमध्ये शूट करण्यात आला असून तेलुगूमध्ये डब करण्यात आला आहे. हिंदी भाषेतल्या ‘विश्वरूपम २’ची प्रस्तुती रोहित शेट्टी आणि रिलायन्स एण्टरटेन्मेंट करणार आहे.
#Vishwaroopam2TrailerOnJune11@ikamalhaasan @GhibranOfficial @PoojaKumarNY @andrea_jeremiah @shekharkapur @vairamuthu @Aascars @aamir_khan @shrutihaasan @tarak9999 pic.twitter.com/04ifmiektO
— Raaj Kamal Films International (@RKFI) June 8, 2018
वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वरूपम’चा हा दुसरा भाग आहे. हसन यांनी यामध्ये गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आई-मुलाच्या नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. यामध्ये कमल हसन यांच्यासोबत राहूल बोस, पूजा कुमार आणि अँड्र्यू जेरेमिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमानही यात दिसणार आहेत. अनेक वर्षांनंतर वहिदा रेहमान मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.