कर चोरी प्रकरणाचा आरोप असलेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू मागे आयकरचा ससेमिरा सुरूच आहे. ३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग, तापसीसह मधू मंटेना आणि विकास बहल यांच्याविरोधात छापेमारीची मोहीम हाती घेतली होती. आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियाद्वारे ‘आता मी स्वस्त राहिले नाहीये’ असे म्हणत वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने तापसीला ‘तू नेहमीच स्वस्त राहशील’ असे म्हणत टोला लगावला आहे.

कंगना ही सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चते असते. आता तिने अभिनेत्री तापसी पन्नूवर निशाणा साधला आहे. “तू नेहमीच स्वस्त राहणार आहेस, कारण तुम्ही सगळे बलात्कारी स्त्रीवादी आहात. तुझा रिंग मास्टर अनुराग कश्यपवर २०१३मध्ये देखील कर चोरी प्रकरणामुळे छापे टाकण्यात आले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला रिपोर्ट समोर आला आहे. जर तू दोषी नसशील तर कोर्टात जा आणि ते सिद्ध करुन दाखव” या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

आणखी वाचा- आता मी स्वस्त राहिले नाहीये; आयकरच्या कारवाईवर तापसीने दिलं उत्तर

काय म्हणाली होती तापसी?

“३ दिवसांच्या शोधात प्रामुख्याने ३ गोष्टींचा समावेश आहे. १. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. २. मी याआधीच नाकारलेल्या ५ कोटी रकमेची ‘कथित’ पावती. ३ सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१३ मधील माझ्यावर टाकलेल्या छापाची आठवण ” या आशयाचे ट्वीट तापसीने केले होते.

२०१३ मध्येही त्याच व्यक्तींवर छापे टाकण्यात आले होते, परंतु त्यावेळी या गोष्टीची काहीच चर्चा झाली नाही असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले होते. आयकर विभागाने दोन चित्रपट कंपन्या, दोन गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि आघाडीच्या अभिनेत्रीच्या निवासस्थानावर छापे टाकून ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा गुरुवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला. मात्र मंडळाकडून कोणाचंही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, तापसी पन्नू, फॅण्टम फिल्म्सचे चार माजी प्रवर्तक कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहल आणि मधु मंटेना यांच्यावर छापे टाकण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.