तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना रणौत जयललिता यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटासाठी तिने सर्वाधिक मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या यशानंतर कंगनाच्या मानधनात वाढ झाली असून तिने जयललिता यांच्या बायोपिकसाठी तब्बल २४ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

जयललिता यांच्या बायोपिकचं हिंदीत ‘जया’ तर तेलुगुमध्ये ‘थलावयी’ असं या नाव असणार आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक विजय यांच्या या चित्रपटासाठी कंगनाने २४ कोटी रुपये मानधन आकारत ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. यापूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती. तिने ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी १० ते ११ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दीपिकाला मागे टाकत कंगनाने कमाईमध्ये बाजी मारली आहे.

उत्कृष्ट अभिनयशैली आणि तितक्याच ताकदीने भूमिकेला दिलेला न्याय यामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन ठरली होती. मात्र आता ती मानधनाच्या बाबतीतही क्वीन ठरत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची निर्मिती विब्री मीडिया प्रोडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे