‘देश वाचवायचा असेल तर आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनाच मत द्या’ असं स्पष्ट मत ‘बॉलिवूडची क्वीन’ कंगना रणौतने नुकतंच मांडलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे तिचा पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आता लोकसभा निवडणुकांविषयी बॉलिवूडमध्येही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. कंगणा अनेक वेळा बॉलिवूड जगतातील मुद्द्यांवर आपलं मत मांडत असते. मात्र यावेळी तिने केलेल्या थेट राजकीय मुद्द्यावरच मत मांडल्यांमुळे साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
‘आपला देश आर्थिक, सामाजिक रुढी-परंपरा अशा अनेक गोष्टींमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे तो एकप्रकारे खड्ड्यातच अडकला आहे असं वाटतं. जर आपल्या देशाला या संकटामधून वाचवायचं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात. खरंतर या संकटातून, खड्ड्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पाच वर्ष हा फारच कमी कालावधी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा आपला देश वाचविण्यासाठी साऱ्यांनीच हातभार लावा’, असं कंगणा म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘देशाला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक योग्य व्यक्ती आहेत. त्यांना वारसाहक्काने पंतप्रधान पद मिळालं नसून त्यांनी मेहनत आणि संघर्ष करत हे पद मिळविलं आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे ते या पदी विराजमान आहेत आणि या साऱ्याचा मान राखत देशाची बिघडलेली घडी नीट बसवायचाही प्रयत्न करत आहे’.
दरम्यान, यापूर्वीही कंगणाने पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला होता. एका कार्यक्रमामध्ये कंगणाने ती पंतप्रधान मोदींची चाहती असल्याचंही म्हटलं होतं. कंगणा सतत तिच्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी तिने केलेल्या वक्तव्यामुळे बॉलिवूडच्या नजराही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत असं दिसून येत आहे.