अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आगामी ‘छपाक’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर हा चित्रपट असून यामध्ये दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावर सध्या दीपिकाच्या या लूकचीच चर्चा आहे. पण या सर्वांत अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिने पोस्टरवर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकाचा लूक पाहून रंगोलीला तिची कथा आठवली. रंगोलीसुद्धा अॅसिड हल्ला पीडित आहे.

‘हे जग कितीही अन्यायकारण आणि अप्रामाणिक असलं तरी आपल्याला ज्याचा द्वेष आहे ते कधीच आपल्या वागण्यातून दाखवू नये. मी स्वत: एक अॅसिड हल्ला पीडित असल्याने दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहीन,’ असं तिने ट्विट केलं.

एकतर्फी प्रेमातून रंगोलीवर अॅसिड हल्ला झाला होता. ‘माझ्या एका डोळ्याची 90 टक्के दृष्टी गेली आहे. अॅसिड हल्ल्यानंतर अन्ननलिका आणि श्वासननलिकेत अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे आयुष्याशी संघर्ष करावा लागला. जवळपास तीन महिने मी आरशासमोर गेले नाही. अॅसिड हल्ल्यात जळलेल्या माझ्या चेहऱ्यावर 57 वेला सर्जरी झाली. अवघ्या 23 वर्षांच्या वयात मानसिक तणावाला सामोरं जावं लागलं. अॅसिड हल्ला पीडितांना कोणतीही चूक नसताना शिक्षा भोगावी लागते,’ असं रंगोलीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

‘छपाक’ या चित्रपटात अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दाखवण्यात येणार आहे. तसेच मालती उर्फ दीपिकाला अॅसिड हल्यानंतर करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.