पाकिस्तानशी बोलून तोडगा काढण्याच्या वक्तव्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आहे. त्यांचं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सिद्धू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधूनही सिद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र सिद्धू यांना शोधमधून काढणं हा समस्येवर उपाय असू शकत नाही अशा शब्दात कपिलनं सिद्धू यांची पाठराखण केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी भडकले होते. ‘द कपिल शर्मा शो’मधूनही सिद्धूची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत हा शो आणि चॅनेलवर बहिष्कार टाकू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला. सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात सिद्धूला कार्यक्रमातून काढून टाकण्यासाठी मोहिमच सुरू करण्यात आली त्यानंतर वाहिनीनं सिद्धूला कार्यक्रमातून काढून टाकलं. याबद्दल ‘द कपिल शर्मा शो’चा कर्ताधर्ता कपिलला विचारण्यात आलं त्यावेळी, ‘ कलाकारांवर बंदी घालणं किंवा सिद्धूला शोमधून बाहेर काढणं हा समस्येवर उपाय असू शकत नाही. सर्वांनी एकत्र येऊनच समस्यांवर उपाय शोधला पाहिजे’ असं कपिलनं म्हटलं आहे.

सिद्धूंची शोमधून गच्छंती केली नसून काही कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे पुढचे काही दिवस ते शोचा भाग नसतील असं कपिलनं स्पष्ट केलं आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चना पूरन सिंग या परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.