करण जोहरचा २०१२ साली आलेला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटात करणनं आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यांच्या बॉलिवूडमधल्या यशात या चित्रपटाचा वाटा महत्त्वाचा ठरला. हा चित्रपट आणि त्यातली गाणीदेखील सुपरहिट झाल्यानंतर करणनं ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ ची घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. पण, अद्यापही करणनं या चित्रपटातील अभिनेत्रींची घोषणा केलेली नाही. या चित्रपटात दोन मुख्य अभिनेत्री असणार आहेत. पण, करणनने मात्र अजूनही मुख्य अभिनेत्रींची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. ही नावं जाहीर करायला करण अजूनही टाळाटाळ करतोय.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार ही नावं जाहीर करण्यासाठी करणला आणखी काही दिवसांचा अवधी हवा आहे. ‘मला माझ्या अभिनेत्रींना योग्य पद्धतीनं समोर आणायचं आहे, त्याचीच तयारी गेल्या काहीदिवसांपासून सुरू आहे. यासाठी दोन्ही अभिनेत्रींचं फोटोशूट सुरू आहे त्यामुळे ते झालं की याच किंवा पुढच्या महिन्यात अभिनेत्रींची नावं जाहीर केली जातील’ असं करणनं सांगितलं आहे. या चित्रपटात सारा अली खानपासून ते मानुषी छिल्लरपर्यंत अनेक नावांची चर्चा होती. पण नंतर मात्र या दोघींऐवजी करणनं अनन्या पांडे आणि ताराची निवड केल्याचं समजत आहे.

पण अद्यापही करणने मुख्य अभिनेत्रींविषयी कमालीची गुप्तता पाळली आहे. २३ नोव्हेंबर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्याच महिन्यात करणने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. टायगरला अभिनेत्रींबद्दल विचारलं असता या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कोणाची निवड झालीय हे आपल्यालाही ठावूक नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे करण  येत्या काही दिवसांत कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे याची चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.