शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिना ‘वीरे दी वेडिंग’मधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. करिना कायमच तिच्या फिटनेसबाबत जागरुक असते. तैमूरच्या जन्मानंतरही तिने झपाट्याने वजन घटविले होते. याचवेळी जिममध्ये घाम गाळत असतानाच काही नेटक-यांनी तिला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल केलं आहे. मात्र करिनाने ट्रोलक-यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

तैमूरच्या जन्मानंतर कमी कालावधीत करिना पूर्वीसारखी फिट झाली आहे. यासाठी ती जिममध्ये अथक प्रयत्न करताना दिसून येते. काही दिवसापूर्वी करिनाचा जिममधून बाहेर पडतानाचा एक फोटो व्हायरल झाला. यावेळी तिने तोकडे कपडे घातल्यामुळे नेटक-यांनी तिला ट्रोल केलं. तर काहींनी नकारात्मक टिकादेखील केली आहे. करिना आता एका लहान मुलाची आई असल्यामुळे तिने आता आईसारखं वागलं पाहिजे. तिला योग्य कपड्यांची निवड करता आली पाहिजे, असा सल्लाही तिला काही जणांनी दिला. हाच सल्ला देणा-यांना आता करिनाने एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.

‘प्रत्येक व्यक्तिने त्याच्या व्यक्तीमत्वाला शोभतील असेच कपडे वापरावेत. आई आहे म्हणून साडीच घालायची हा कोणता नियम नाही. आणि विशेष म्हणजे आई झाल्यावर कसे कपडे घालायचे हे मला माहित नाही. कारण माझ्या घरात सर्वच महिला मॉर्डन,पाश्चात्य कपडे वापरतात. माझी आई बबिता असो किंवा माझी सासू शर्मिला टागोर या दोघीदेखील पाश्चात्य कपडे घालतात. माझी आईत जीन्स-टॉपमध्ये खूपच सुंदर दिसते. तसंच माझ्या सासूबाई साडीमध्ये जेवढ्या छान दिसतात तेवढ्याच सुंदर त्या जीन्समध्येदेखील दिसतात’, असे करिना म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘माझा जन्म अशा कुटुंबात झाला आहे जेथे महिलांवर कोणतीच सक्ती नसते. घरातल्या महिला तेच कपडे घालतात जे घालण्याची त्यांची इच्छा असते. मी आई झाले म्हणजे शॉर्ट कपडे घालणं बंद करुन संपूर्ण शरीर झाकलं जाईल असेच कपडे घालायला हवेत असं नाही. जर तुम्हाला तुमच्या व्यक्तीमत्वावर विश्वास असेल तर तुम्ही तुम्हाला शोभतील असे कपडे नक्कीच घालू शकता’.

दरम्यान, करिनाने तिचं मत व्यक्त करुन नेटक-यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय असं म्हणायला हरकत नाही. ‘वीरे दी वेडिंग’मधून कमबॅक करिना या चित्रपटात नक्कीच आपल्या अभिनयाची जादू दाखवेल अशी आशा आहे. या चित्रपटामध्ये सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया या अभिनेत्री प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत.