अभिनेता बॉबी देओल याची ‘आश्रम 2’ ही वेब सीरिज सध्या चर्चेत आली आहे. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी प्रकाश झा यांना करणी सेनेने कायदेशीर नोटीस पाठविल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, ‘आम्ही अशी कोणतीच नोटीस पाठविली नाही’, असं स्पष्टीकरण करणी सेनेकडून देण्यात आलं आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे राज्य संघटन मंत्री सुरजित सिंह यांनी ट्विटरवर करुन ही माहिती दिली.
अलिकडेच ‘आश्रम 2’ या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यात आश्रम आणि हिंदू चालीरिती यांच्याविषयी चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्याचं करणी सेनेने होतं. सोबतच करणी सेनेने याप्रकरणी निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवत दुसऱ्या पर्वाचं प्रदर्शन थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र, या प्रकरणी आता सुरजित सिंह यांनी ट्विट करत ही माहिती खोटी असल्याचं म्हटलं आहे.
कल से एक न्यूज़ चल रही है की सूरजीत सिंह ने फ़िल्म निर्देशक @prakashjha27 को एक नोटिस भेजा। है इसको लेकर बहुत सारे न्यूज़ पत्रकार साथियो का फ़ोन आया था लेकिन में स्पष्ट करता हूँ मैने कोई नोटिस नही भेजा है (ये फ़र्ज़ी नोटिस है ) @ZeeNews @ABPNews @Republic_Bharat @republic
— surjeet singh Rathore (युवा अध्यक्ष ) (@surrjeetrathore) November 6, 2020
“आमच्याकडून अशा कोणत्याही प्रकारची नोटीस प्रकाश झा यांना पाठवण्यात आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर जे पत्र फिरत आहे, ते खोटं आणि बनावट आहे”, असं स्पष्टीकरण सुरजित सिंह यांनी दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता बॉबी देओल याची ‘आश्रम 2’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या सीरिजमध्ये दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत करणी सेनेने प्रकाश झा व एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मलादेखील नोटीस बजावल्याचं सांगण्यात आलं होतं. आश्रम या वेब सीरिजमधून धार्मिक परंपरा, प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि आश्रम धर्म यांच्याविषयी चुकीचा समज परसविला जात असल्याचं करणी सेनेने त्यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटलं होतं.
प्रकाश झा यांचं नोटीशीला उत्तर
करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस आल्यानंतर प्रकाश झा यांनी एका मुलाखतीत या नोटीशीला उत्तर दिलं होतं. “त्यांनी केलेल्या मागणीवर उत्तर देणारा मी कोणी नाही. या सीरिजच्या पहिल्या सीजनला ४०० मिलिअन व्ह्युज मिळाले होते. मला वाटतं कोणताही निर्णय घेण्यासाठी प्रेक्षक समर्थ आहेत. त्यामुळे हा विषय आपण प्रेक्षकांवरच सोडून देऊयात. तेच योग्य तो निर्णय घेतील”, असं प्रकाश झा म्हणाले.