अभिनेता कार्तिक आर्यन बॉलिवूड सिनेसृष्टीतील नवा सुपरस्टार म्हणून उदयाला येत आहे. ‘पती पत्नी और वो’, ‘प्यार का पंचनामा’, ‘गेस्ट इन लंडन’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या कार्तिकचे फॅन फॉलोइंग कुठल्याही सुपरस्टार पेक्षा कमी नाही. मात्र त्याने आमिर खान होण्याचा प्रयत्न करु नये, असा सल्ला अभिनेत्री कंगना रनौतने त्याला दिला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती कार्तिक आर्यनमुळे चर्चेत आहे. एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ती कार्तिकची खूप मोठी फॅन आहे. मात्र तो आमिर खान होण्याचा प्रयत्न करतोय असं तिला वाटतं.

नेमकं काय म्हणाली कंगना?

“कार्तिक आर्यन एक प्रतिभाशाली अभिनेता आहे. मात्र तो आमिर खान होण्याचा प्रयत्न करतोय असं अनेकदा वाटतं. तो खूप वेगळ्या शैलीचा अभिनेता आहे. त्याचे गुण-दोष वेगळे आहेत. त्यामुळे त्याने कोणालाही कॉपी करत बसण्यापेक्षा स्वत:ची वेगळी शैली निर्माण करावी. जसं अक्षय कुमार आणि गोविंदा यांनी केलं. त्यांनी कुठल्याही पारंपारिक शैलीपेक्षा वेगळ्या पठडीचा अभिनय केला. अक्षय तर आज सुपरस्टार आहे. त्याच्या नावावरच चित्रपट चालतात. त्यामुळे कार्तिकने अक्षय किंवा गोविंदा सारख्या अभिनेत्यांचा आदर्श बाळगत स्वत:ची वेगळी शैली निर्माण करावी. मग लोक त्यालाच कॉपी करतील.” असा सल्ला कंगनाने कार्तिक आर्यनला दिला.

कंगनासोबतच दीपिका पदुकोण देखील कार्तिकची खुप मोठी फॅन आहे. तिने आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्याची तोंड भरुन स्तुती केली आहे.