बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन सध्या छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या ११ व्या पर्वामध्ये व्यस्त आहेत. दरवेळी प्रमाणे या पर्वाचंही ते सूत्रसंचालन करत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारे बिग बी अनेक वेळा या सेटवर घडणाऱ्या रंजक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेक जण केबीसीमध्ये आपले स्वप्न साकार करण्यासाठी येतात. आतापर्यंत या सेटवर अनेकांनी हजेरी लावली असून पहिल्यांदाच या सेटवर एक मांजर आल्याचं पाहायला मिळालं. बिग बींनी या मांजरीचा फोटो शेअर केला असून त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे.

खरं तर केबीसीच्या मंचावर आजवर अनेकांनी हजेरी लावली आहे. मात्र पहिल्यांदाच एक मांजर या मंचावर पाहायला मिळालं. ही मांजर मंचावर दिसल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तिचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच एक कविताही लिहीली आहे. ‘ऐ बिलौरी, बिल्ली बिल्ली, खेलन चली KBC,जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

 वाचा : …म्हणून ऐश्वर्या राय गरोदर असताना मधूर भांडारकर होता नैराश्यात

दरम्यान, या सेटवर ही मांजर चुकून आली होती. मात्र या फोटोवर अनेकांनी मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. ही मांजर ऑडिशनसाठी आली आहे का? असेही प्रश्न काहींनी विचारले आहेत. सध्या अमिताभ बच्चन या शोव्यतिरिक्त ‘गुलाबो-सिताबो’, ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत.