बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला यंदाचं वर्ष चांगलंच लकी ठरणार आहे. या वर्षामध्ये त्याचा केसरी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांनी दहा हजार अफगाण सैनिकांना दिलेला लढा या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतंच या चित्रपटातलं ‘सानू कहेंदे’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

प्रदर्शित झालेल्या गाण्यामध्ये शीख रेजिमेंटच्या सैनिकांचं एकमेकांशी असलेलं मैत्रीपूर्ण नातं दिसून येत आहे. त्यातच गाण्याला दमदार रोमी आणि ब्रिजेश शांडिल्य यांचा दमदार आवाज लाभला आहे. त्यामुळे हे गाणं ऐकताना आपोआप आपली पावले थिरकली जातात. हे गाणं अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

दरम्यान, या गाण्याला तनिष्का बाग्चीने संगीत दिलं असून गणेश आचार्य यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे हे गाणं पाहण्यासारखं आहे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या २१ सैनिकांची अविश्वसनीय अशी शौर्यगाथा केसरीतून रुपेरी पड्यावर पहायला मिळाणार आहे. करण जोहर आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग सिंगने त्याच्या खांद्यावर घेतली आहे.