‘दबंग’गर्ल म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सुरुवातीचे काही चित्रपट सोडले तर तथाकथित मसाला व्यावसायिक चित्रपटांपेक्षा निवडक भूमिका किंवा चित्रपटांवर भर दिला आहे. ‘अकिरा’सारखा पूर्ण अ‍ॅक्शनपट करणारी अभिनेत्री म्हणूनही तिचं कौतुक झालं. आता पुन्हा एकदा तिच्या अशाच हटके भूमिका असलेल्या चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. सेक्स क्लिनिक चालवणाऱ्या मुलीची- बेबी बेदीची भूमिका सोनाक्षी करते आहे. ‘खानदानी शफाखाना’ या शिल्पी दासगुप्ता दिग्दर्शित चित्रपटात सोनाक्षी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटानिमित्ताने लैंगिक संबंध हा आजही दबक्या आवाजातच बोलण्याचा विषय आहे, असं सांगत हे चित्र वेगाने बदलण्याची गरज असल्याचं मत सोनाक्षीने व्यक्त केलं.

‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाचा विषय खूप वेगळा असला तरी तो आत्ताच्या काळातही खूप महत्त्वाचा आहे. जगभरात फक्त भारतात आजही लैंगिकतेचा विषय निघाला की लोक चिडीचूप होतात. जी खूप नैसर्गिक गोष्ट आहे. लैंगिकता हे आपलं वास्तव आहे, ज्यामुळे आपण या जगात आहोत. मग त्याविषयी आपण बोलायचं का टाळतो, असा सवाल सोनाक्षी करते. जिथं लैंगिकतेबद्दल बोललंच जात नाही तिथं त्यासंबंधातील आजारांची कल्पना लोकांना कशी येणार. त्यासाठी या विषयाचं शिक्षण सगळ्या वयातील लोकांना देणं गरजेचं आहे, असं ती म्हणते. आपल्याकडे हिंदी, इंग्रजी, भूगोल असे विषय आपण शिकतोच, मग जो आपल्या शरीराचा भाग आहे तो का समजून घ्यायचा नाही. आपल्याला सर्दी झाली, ताप आला तर आपण डॉक्टरकडे धाव घेतो. मग एखादा लैंगिक आजार झालाच तर आपण लपतछपत डॉक्टरकडे का जातो? आजार हा आजार असतो आणि त्याकडे त्या दृष्टीनेच बघायला हवं. हे सगळे मुद्दे या चित्रपटातून हलक्याफुलक्या, नर्मविनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत, अशी माहिती सोनाक्षीने दिली.

लैंगिक शिक्षण हे शाळेपासूनच सुरू झालं पाहिजे, हेही ती आग्रहाने मांडते. कधी ना कधी तरी ते आपल्याला शिकावंच लागतं. मुलांना जर या विषयाची माहिती योग्य पद्धतीने सांगितली गेली नाही तर ती ते चुकीच्या पद्धतीने मिळवणारच आहेत. त्यातही आपल्याकडे आईवडील मुलांशी या विषयावर बोलायला कचरतात. मुलांशी लैंगिकतेबद्दल बोलण्यात त्यांना खूप संकोच वाटतो, पण तशी गरज नाही. हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आहोत, असे सांगतानाच या विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन एका रात्रीत बदलणार नाही याचीही आपल्याला जाणीव असल्याचे ती सांगते. मुळात हा विषय तिच्याकडे आला तेव्हा तिच्याही मनात पहिल्यांदा शंकेची पाल चुकचुकली होती, हेही तिने मोकळेपणाने सांगितलं.

मी जेव्हा पटकथा वाचली.. किंबहुना मला एका वाक्यात कथा ऐकवली गेली ती अशी होती की, एका मुलीला वारसाहक्काने सेक्स क्लिनिक चालवण्याची जबाबदारी अंगावर पडते. आता हे ऐकल्यावर माझंही असं झालं होतं की, हा चित्रपट मी कसा करणार? माझीही मानसिकता तशीच होती. मी सोनाक्षी सिन्हा आहे. मी कौटुंबिक चित्रपट करते, मी असा चित्रपट कसा करणार? पण मी जेव्हा पूर्ण पटकथा वाचली तेव्हा माझा निर्णय पक्का झाला की हा चित्रपट मीच करणार. आपल्याशी संबंधित समस्यांवर आपण चित्रपट करायलाच हवेत, असं वाटल्यानेच मी हा चित्रपट स्वीकारला असं तिने सांगितलं.

मुळात लैंगिक संबंध असोत किंवा त्या संदर्भातील अडचणी.. याबद्दल घरच्यांशी कधीच आपला संवाद होत नाही, हेही ती सांगते. माझाही कधी माझ्या आईवडिलांबरोबर असा संवाद झाला नव्हता. माझ्याच बाबतीत असं आहे तर अशी कित्येक मुलं-मुली असणार, जे कधीच या विषयावर आपल्या आईवडिलांशी बोललेले नाहीत. आपल्याकडे ज्या पद्धतीने मुलांना वाढवलं जातं, त्यात या गोष्टींचा विचारच केलेला नाही. आम्हीही इतरांसारखेच महाविद्यालयात जायला लागल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींशी या विषयावर बोलून बोलूनच माहिती घेतलेली आहे. आपल्याकडे लैंगिक समस्यांबद्दल आपण पालकांशी कमी आणि मित्रमैत्रिणींशीच जास्त बोलतो. त्यामुळे हे चित्र सुधारण्याची गरज सोनाक्षीने व्यक्त केली.

हा चित्रपट शिल्पी दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. त्याबद्दल बोलताना सोनाक्षी म्हणते, हा विषय ज्या संवेदनशीलतेने हाताळायला हवा ते एखाद्या पुरुष दिग्दर्शकाला तितक्या चांगल्या पद्धतीने जमला असता असं मला वाटत नाही. या चित्रपटाची दिग्दर्शिका शिल्पी दासगुप्ता हिचा हा पहिलाच चित्रपट आहे. ती पहिली अशी दिग्दर्शिका आहे जिच्याबरोबर काम करताना मला खूप सुंदर अनुभव मिळाला आहे. मुळात मी पहिल्यांदाच दिग्दर्शिकेबरोबर काम करते आहे. पहिल्याच चित्रपटात इतका बोल्ड विषय तिने मांडला आहे. हा विषय जर नीट हाताळला नसता तर तो एकतर भडक किंवा अश्लीलतेकडे झुकण्याची दाट शक्यता होती. किंवा त्याच्यावर काही ना काही तरी वाद नक्कीच झाले असते. मात्र शिल्पीने खूप हुशारीने या कथेवर काम करत तो लोकांसमोर आणला आहे, असं तिने सांगितलं. या चित्रपटात सोनाक्षीबरोबर सगळ्या पुरुष कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सगळी भट्टी जमवून आणण्याचे श्रेयही तिने दिग्दर्शिकेला दिलं.

दिग्दर्शक म्हणून ती आणि कलाकार म्हणून मी अशा आम्ही दोघीच स्त्रिया सेटवर होतो, बाकी सगळ्या पुरुष कलाकारांबरोबर आम्हाला या विषयावरच्या चित्रपटात काम करायचं होतं. पण तिने सेटवर खूप मोकळं वातावरण निर्माण केलं होतं. कोणताही कलाकार तिच्याशी या चित्रपटाशी संबंधित कुठल्याही विषयावर खुलेपणाने बोलू शकेल, चर्चा करू शकेल असं खेळीमेळीचं वातावरण, एक विश्वास तिने निर्माण केला होता. इतरांचाच कशाला, माझे स्वत:चे असे अनेक अनुभव आहेत. एक प्रसंग आहे, जिथं मी सायकल रिक्षा चालवते आहे. माझ्या मागे एक मोठा बोर्ड आहे ज्यावर मोठय़ा अक्षरात सेक्स क्लिनिक असं लिहिलं आहे. त्याखाली सगळे आजार नोंदवलेले आहेत आणि मी मोठमोठय़ाने माझ्या खानदानी शफोखान्याची जाहिरात करते आहे. हा प्रसंग पंजाबमध्ये अमृतसरच्या भर बाजारात चित्रित होत होता. आणि तिथे कुठलेही जादा कलाकार नव्हते. ते सगळे तिथले स्थानिक लोक होते आणि फार विचित्र पद्धतीने ते हे सगळं बघत होते. पण दिग्दर्शक म्हणून शिल्पीने खूप सुंदररीत्या तो प्रसंग माझ्याकडून करून घेतला. असे अनेक अनुभव या चित्रपटाच्या निमित्ताने जमा झाले असल्याचेही सोनाक्षीने सांगितले.

या चित्रपटात बेबी बेदीला तिच्या वडिलांकडून हा दवाखाना वारसाहक्काने मिळतो, खरं म्हणजे आपल्या देशात वडिलोपार्जित संपत्ती ही बहुतांशी मुलांनाच मिळते. मात्र या चित्रपटात बेबी बेदीचं तिच्या वडिलांबरोबर खूप खास नातं आहे, असं ती सांगते. बेबी अशी मुलगी आहे जिने फार कमी वयात घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत. तिचा एक भाऊही आहे, पण तो काहीच करत नाही. त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी बेबीवर आहे आणि त्याच विश्वासातून हा दवाखानाही तिच्याकडे आला आहे. त्यामुळे मुळातच खंबीर असलेली बेबीची भूमिका आपल्याला जास्त आवडली, असं तिने सांगितलं.

सोनाक्षीने आजवर ज्या भूमिका केल्या आहेत, त्या प्रत्येकाला एक विनोदी छटा होती. त्याबद्दल बोलताना, मला विनोदी चित्रपट करायला खूप आवडतात, कारण लोकांना हसवणं ही खूप अवघड कला आहे. म्हणजे आम्ही रडण्याचं दृश्य देऊ, इतरही काही सहज दाखवू.. पण विनोदी भूमिका, संवाद यासाठी ते टायमिंग आवश्यक असतं. ते तुम्हाला उत्तम जमलं पाहिजे, असं सोनाक्षी सांगते. या चित्रपटात तर माझ्याबरोबर वरुण शर्मा जो स्वत: एक चांगला विनोदी कलाकार आहे, बादशहा ही विनोदी आहे आणि अन्नू कपूर तर सेटवर किस्से सांगत हसवत ठेवायचे सगळ्यांना.. यांच्यामुळे मला ही भूमिका करणं अधिकच सोपं गेलं, असंही ती मनमोकळेपणाने सांगते.

‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे. लागोपाठ १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘मिशन मंगल’मध्येही तिची महत्त्वाची भूमिका आहे. आणि आता ‘दबंग ३’चेही चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे वर्ष सुखावणारं आहेच, असं म्हणताना याच वर्षी ती ‘भूज : द प्राइड ऑफ इंडिया’चं चित्रीकरणही सुरू करणार असल्याची माहिती तिने दिली.

सिनेसृष्टीतील लेखक बदलले आहेत, त्यांच्या विचारांमुळे आशय बदलला आहे. दिग्दर्शकांची विचारसरणी बदलली आहे. त्यामुळे एकूणच मुलींना खूप चांगल्या आशयात्मक भूमिका मिळत आहेत. इंडस्ट्रीतला हा बदल सुखावणारा आहे, मात्र असे प्रयोग अधिक वाढायला हवेते. ‘दबंग’ ते ‘खानदानी शफाखाना’ तिच्या चित्रपटांचा आलेख हा उंचावता राहिला आहे. या प्रवासाविषयी नेहमीच कु तूहल वाटतं. मला मुळात अभिनेत्री व्हायचं नव्हतं. ‘दबंग’ करतानाही मी यापुढे हेच करणार आहे याची काही जाणीव नव्हती. पण जेव्हा त्या भूमिकेचं कौतुक झालं. त्यानंतर चांगल्या भूमिका वाटय़ाला आल्या आणि मी शिकत शिकतच अभिनेत्री म्हणून घडत गेले. मला हा प्रवास म्हणून खूप महत्त्वाचा वाटतो.  – सोनाक्षी सिन्हा