सध्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हिमाचलमध्ये ‘शेरशाह’ चित्रपटाचे शूटींग करत आहेत. कियाराने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सिद्धार्थसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. चित्रपटाच्या एका भागाचे शूटिंग संपवताना सिद्धार्थला निरोप देण्यासाठी एक गोड मेसेज लिहीत तिनं फोटो पोस्ट केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थ धर्मशाला आणि पालमपूरमध्ये शूटिंग करत आहेत. या भागातील कियाराचे शूट संपले असून परत जाण्याआधी तिने एक फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थ आणि कियारा गप्पा मारत एक फोटो अल्बम बघत आहेत असा हा फोटो आहे. कियारा आणि सिद्धार्थ एकत्र असल्याच्या अनेक चर्चा आहेत. पण, या दोघांनी मात्र याविषयी मौन बाळगले आहे. फोटो शेअर करत कियाराने असं लिहिलं आहे की, ‘सिद्धार्थ… माझा कथित बॉयफ्रेंड पण खास मित्र..त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली.’ त्यामुळे कियाराने सिद्धार्थसोबतच्या अफेअऱच्या अफवांवर मजेशीर उत्तर दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णू वर्धन असून निर्माता करण जोहर आहे. ‘या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रांची भूमिका साकारण्याची माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.’ असं सिद्धार्थ म्हणाला.

परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन ‘विक्रम बत्रा’ यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटात विक्रम बत्रांची भूमिका सिद्धार्थ साकारत आहे.या भूमिकेसाठी त्याने स्वतःच्या शरीरयष्टीवर विशेष मेहनत घेतली असून कॅम्पमध्ये ट्रेनिंगसुद्धा घेतले आहे. कॅप्टन विक्रम बत्रांच्या प्रेयसीच्या भूमिकेत कियारा दिसणार आहे. चंदिगढमधील शूट संपल्यानंतर या चित्रपटाचे उरलेले चित्रीकरण हिमाचलमध्ये होणार आहे.