समाजामध्ये आजही तृतीयपंथी समाजाकडे तुच्छतेच्या नजरेने पाहिलं जातं. त्यांना निम्न दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना समान नागरी हक्क मिळाला असला तरी समाजाने अद्याप त्यांना स्वीकारलेलं नाही. इतकंच काय तर अनेक वेळा त्यांचे कुटुंबीयही त्यांचा स्वीकार करत नाही. त्यामुळेच तृतीयपंथी समाजातील व्यक्तींचा बालपणापासूनचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. सुहास भोसले दिग्दर्शित कोती हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यातून तृतीयपंथी व्यक्तींच्या बालपणावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनीता पोटे केली आहे.

“कोती” चित्रपटाचा विषय हा तृतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट असलेला आहे. आपल्या भावाला समाजात मिळत असलेल्या हीन वागणुकीमुळे या समाजाच्याविरोधात एका भावाने दिलेला लढा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांचा विषय हाताळलेला नाही. या पार्श्वभूमीवर, ‘कोती’ महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये चित्रपटाचा गौरव झाला आहे. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. भारत सरकारने कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार पटकावले आहेत.
आज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे, संजय कुलकर्णी, विनीता काळे, मोहिनीराज गटणे यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. वाळू माफियांवर आधारित रेती या चित्रपटातून भोसले यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. “कोती” चित्रपटाची कथा पटकथा संवाद राज दुर्गे, भरत आर पार्थसारथी यांनी छायांकन सागर वंजारी यांनी संकलक, संजय नावगिरे यांनी गीते तर बबन अडागळे व मनोज नेगी यांचे संगीत लाभले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”कोती’ हा हृदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटाने अनेक मानसन्मान मिळवून दिले. अतिशय महत्त्वाचा विषय चित्रपटात हाताळण्यात आला आहे. महोत्सवांमध्ये कौतुक झाल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाचं कशा पद्धतीनं स्वागत करतात या विषयी उत्सुकता आहे. महत्त्वाच्या विषयासह नातेसंबंध, सामाजिक दृष्टिकोन अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली आहे. या चित्रपटानंतर समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षा आहे”, अशी भावना दिग्दर्शक सुहास भोसले यांनी व्यक्त केली.