‘त्या’ दोघीही जणी आपापल्या जागी सर्वोच्च पातळीवर. दोघींचेही हजारो, लाखो चाहते. चाहत्यांमध्ये नेहमीच ‘ती’ की ‘ही’ श्रेष्ठ यावरून चर्चा आणि वाद. काही वर्षांपूर्वी ‘त्या’ दोघींनी एकत्र गायन केलेही होते. मात्र अलीकडच्या काळात त्या पाश्र्वगायन किंवा अन्य कोणत्याही कारणाने अपवाद वगळता ‘त्या’ एकत्र आलेल्या नाहीत. मात्र आता दीर्घ कालावधीनंतर ‘त्या’ दोघींच्या एकत्र येण्याचा सुयोग जुळून आला आहे.
होय, लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघी जणी एका नव्या अल्बमसाठी एकत्र काम करणार आहेत. लता मंगेशकर यांच्या ‘एल. एम. म्युझिक कंपनी’ची निर्मिती असलेला ‘ये हवा’ नावाचा हिंदी गाण्यांचा अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहे. या अल्बममधील गाणी गाण्यासाठी लता दीदींनी आपल्या धाकटय़ा बहिणीची अर्थात आशाची निवड केली आहे. लता आणि आशा या दोघींच्याही चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आशा भोसले यांच्याबरोबर या अल्बममधील गाणी प्रसिद्ध गायक शान गाणार आहे.
लतादीदींनी स्वत: ‘ट्विटर’वरून ही गोष्ट जाहीर केली आहे. ‘नमस्कार, मला सांगायला आनंद वाटतोय की, आमच्या एल. एम. म्युझिक कंपनीतर्फे ‘ये हवा’ या नव्या अल्बमची निर्मिती केली जाणार आहे. यातील गाणी आशा आणि शान यांनी गायली आहेत.’ अशी माहिती लतादीदींनी ‘ट्विट’ करून दिली आहे.
८५ वर्षीय लता मंगेशकर यांनी वयोपरत्वे गाण्यांचे कार्यक्रम करणे तसेच पाश्र्वगायन थांबविले असले तरी आशा भोसले मात्र अद्यापही गाण्याचे जाहीर कार्यक्रम आणि पाश्र्वगायन पूर्वीच्याच उत्साहाने करत आहेत. लतादीदींनी पाश्र्वगायन थांबविले असले तरी त्यांच्या ‘एल. एम.’ म्युझिक कंपनीचे काम त्या आवर्जून पाहतात. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उत्सव’ या चित्रपटातील ‘मन क्यूं बहेका रे बहेका’ हे गाणे लता आणि आशा यांनी एकत्र गायले होते. तसेच अगोदर काही चित्रपटांतून ‘कोई आएगा आएगा’ (प्रोफेसर), ‘ओ चाँद जहा वो जाए’ (शारदा), ‘मैं चली, मैं चली’(पडोसन), ‘मन भावन के घर’ (चोरी चोरी)आदी काही गाणी एकत्र गायली आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांत दोघींनी एकत्र काम केले नव्हते. आता ‘ये हवा’ या नव्या अल्बमच्या निमित्ताने लतादीदींच्या म्युझिक कंपनीची निर्मिती असलेल्या अल्बममध्ये दोघी एकत्र काम करणार आहेत. या अल्बमचे संगीत तरुण संगीतकार रोहन शहा याचे आहे.
या नव्या अल्बममध्ये लतादीदी स्वत: गाणार नसल्या तरी लवकरच पुन्हा एकदा लता आणि आशा यांनी एकत्र गायन करावे आणि ‘एल. एम’ म्युझिक कंपनीच्या पुढच्या अल्बममध्ये आता या दोघींनी एकत्र गावे, अशी अपेक्षा या दोघींच्याही चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.