22 November 2019

News Flash

दूरवस्थेमुळे रंगमंचाला दूरावले

सध्या सगळीकडेच ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा आहे तो म्हणजे मुक्ता बर्वेचा ‘बंदिशाळा’.

सध्या सगळीकडेच ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा आहे तो म्हणजे मुक्ता बर्वेचा ‘बंदिशाळा’. आजवर तिच्या अनेक भूमिका प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. प्रत्येक भूमिकेत असणारे वेगळेपण तिने लीलया पेलले आहे. मग ती ‘जोगवा’मधली सुलक्षणा असो वा ‘आम्ही दोघी’मधील अम्मी. कायमच नवीन छटा असणारी मुक्ता आपल्याला प्रत्येक चित्रपटातून पाहायला मिळाली आहे. तीच मुक्ता आता तुरुंग अधीक्षकाच्या म्हणजेच जेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. २१ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘बंदिशाळा’ या चित्रपटात प्रेक्षकांना तुरुंग आणि तुरुंगातील जीवन अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रात घडलेल्या एका सत्य घटनेवरून प्रेरित होऊ न या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद लेले आणि अभिनेत्री मुक्त बर्वे यांनी ‘लोकसत्ता’शी दिलखुलास संवाद साधला.

एकीकडे अभिनेत्री म्हणून नावारूपाला येत असतानाच नाटय़निर्मितीत पाऊल टाकत मुक्ताने काही दर्जेदार नाटकं रसिक प्रेक्षकांना दिली. मात्र ‘कोडमंत्र’ या नाटकानंतर मुक्ता रंगमंचापेक्षा चित्रपटातच जास्त रमलेली दिसली. नाटकं अजूनही मला खुणावतात, मात्र मी नाटकापासून दूर राहण्याचे कारण हे सध्या दुरावस्थेत असलेली राज्यभरातील नाटय़गृहे आहेत, याकडे लक्ष वेधत ती दुरुस्त करण्यात सगळ्याच स्तरावर उदासीनता असल्याबद्दल तिने खंत व्यक्त केली.

ज्याला आपण रंगदेवतेचे मंदिर मानतो त्याची साधी स्वच्छता पाळत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक नाटय़गृहं आज सोयीसुविधांपासून वंचित आहेत. कुठे विंगा कोसळल्या आहेत तर कुठे पडदे फाटले आहेत. एकीकडे रंगमंचाची दुरवस्था तर दुसरीकडे प्रेक्षागृहातील खुच्र्या तुटल्या आहेत. प्रसाधनगृहांची अवस्था तर पाहावीशी वाटत नाही. आणि अशा वातावरणाला आपण नाटय़गृह म्हणावे का हाच प्रश्न आहे. कलाकार म्हणून मला नाटक हे अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. भारतात बंगाली, गुजराती आणि मराठी अशा तीनच प्रादेशिक रंगभूमी सध्या जिवंत आहेत. त्यातही मराठी रंगभूमी सर्वात प्रभावी आणि अग्रेसर आहे. सतत नवनवीन प्रयोगशील कलाकृती येत आहेत. कलाकार – सहकलाकार सगळेच मेहनत घेत आहेत. असे असताना जर त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणार नसतील तर त्या नाटय़गृहाचा काय उपयोग, असा सवाल तिने केला. नाटक हा रंगभूमीचा आत्मा आणि माझे नाटकावर प्रेम असले तरीही केवळ त्यासाठी अशा पद्धतीची तडजोड मी कधीही करणार नाही. यात सुधारणा व्हायलाच हवी. तरच रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत हे विधान योग्य ठरेल, असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले.

जेलर माधवी सावंत साकारताना..

आयुष्यात अशा अनेक घडामोडी घडल्या ज्यामुळे माझ्या माणूस म्हणून जगण्यात बदल झाले. ‘जोगवा’ हा चित्रपट त्यापैकीच एक होता. ‘बंदिशाळा’ करताना हा अनुभव पुन्हा एकदा आला, असे तिने सांगितले. चित्रीकरणाचे ३२ दिवस मी वेगळे आयुष्य जगले. एक स्त्री, तिचा संघर्ष आणि तेही तुरुंगातील वातावरण असे असताना मला हे जमले का याचे फार दडपण होते. कारण एक राकट तुरुंग अधीक्षक जी कैद्यांना सरळ करण्यासाठी मारते, झोडते. आणि तीच बाई घरी गेल्यावर मात्र एका गृहिणीचे कर्तव्य पार पाडते. या सगळ्या छटा एकाच वेळी साकारणे आव्हानात्मक होते. परंतु आमचे दिग्दर्शक मिलिंद लेले, लेखक संजय पाटील आणि अ‍ॅक्शन मास्तर प्रशांत नाईक या तीन माणसांमुळे हे पात्र साकारू शकले, असे तिने सांगितले. या भूमिकेसाठी शासकीय सेवेत असणाऱ्या किरण बेदी, मीरा बोरवणकर अशा अनेक महिला अधिकाऱ्यांच्या मुलाखती पहिल्या. भूमिकेचा अभ्यास केला आणि त्यातूनच या चित्रपटातील माधवी सावंत साकारली गेली, अशी माहिती तिने दिली.

लोक अभिनेत्री म्हणून आपल्याला ओळखू लागले, त्या दिवसापासून अनेक चित्रपट येत होते. म्हणजे जोगवानंतर असे चित्रपट माझ्याकडे आले, ज्यात माझी तशीच भूमिका होती. पुन्हा पुन्हा त्याच भूमिका केल्या, तर मग आधी केलेल्या कामाला काहीच अर्थ राहत नाही. आणि आपली एकच एक ओळख बनून राहते. ‘मुंबई पुणे मुंबई’वगळता मी एकच एक भूमिका टाळल्या आहेत. आणि सुदैवाने अशा भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या नाहीत, याचे श्रेय मी प्रेक्षकांनाही देते. कारण प्रत्येक भूमिकेतली मुक्ता त्यांनी स्वीकारली. कदाचित त्यातूनच नवनवीन प्रयोग करण्याचे बळ मिळत जाते. लेखक नवनवीन लिहित असतात ते साकारण्याची संधी मला मिळते. त्या संधीला न्याय देण्याचे काम मी आजवर करत आले आहे. अजून बऱ्याच भूमिका येतीलच. आता वेबसीरिज हे नवीन माध्यम खुले झाले आहे. हे माध्यम सध्या सेन्सॉर बंधनांच्या पलीकडे आहे. मात्र यात आपण आपल्या मर्यादा पाळल्या तर ते नक्कीच प्रभावी माध्यम आहे. चित्रपटात एखादे गीत जितक्या सहजतेने येते तितक्या सहजतेने एखादे प्रणयदृश्य आले तर लोक ते स्वीकारतील. चांगले विषय त्या माध्यमातून पुढे येत आहेत. लवकरच मी याचाही विचार करेन, असे मुक्ता म्हणाली.

देशासाठी जगणारे लोक..

‘कोडमंत्र’च्या निमित्ताने गणवेशातील अधिकाऱ्याची भूमिका मी केली होती. या भूमिका साकारताना त्या व्यक्तींविषयी मनात आदर असणेही गरजेचे आहे. कोण असतात हे पोलीस, आर्मी किंवा नेव्हीचे जवान जे कोण्या परक्या माणसांसाठी आपले आयुष्य वेचायला तयार असतात. ज्यांना स्वत:चे वैयक्तिक आयुष्यच उरत नाही, असे सांगत ३१ डिसेंबरच्या रात्री दरवर्षी आपण पोलिसांना चहा-पाणी आणि बिस्कीट नेऊ न देत असल्याची माहितीही तिने गप्पांच्या ओघात दिली. जेव्हा देश आनंद साजरा करत असतो तेव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी उभे असतात. आणि अशा भूमिका माझ्या वाटय़ाला येत असतील तर ते मी माझे भाग्य समजते, अशा शब्दांत मुक्ताने या अधिकाऱ्यांविषयी वाटणारा आदर, प्रेम व्यक्त केले.

नाटय़गृहाप्रमाणेच प्रेक्षकांचीही कानउघाडणी करणे गरजेचे आहे.  सध्या सुमीत राघवनच्या समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेचा अनेकांकडून उल्लेख होतो आहे. अनेक महिने कलाकार त्या नाटकावर मेहनत घेत असतात, जीवशिव एकत्र करून नाटक घडत असते. एक सुंदर रसाविष्कार समोर सुरू असताना अचानक कुणीतरी हसण्याचा आवाज येतो. कुणीतरी फोनवर बोलत असते. अनेकांचे फोन खणखणतात. अशा वेळी त्या कलाकाराचे काय होत असेल याची जाणीव प्रेक्षकांना असायला हवी. दोन तास एकाग्र होऊ न नाटक पाहण्याएवढी सहनशीलता आणि संवेदनशीलता आपल्यात उरली नसेल, तर प्रेक्षकांनी नाटकाला येऊ  नये. हा केवळ राग नसून ही कलाकाराची तळमळ आहे. या गोष्टी सांगाव्या लागतात हेच दुर्दैव आहे. अशा घटनांमुळे संपूर्ण नाटकाचा विरस होतो. प्रेक्षकांसहित कलाकारही विचलित होतात. उत्तम प्रयोग घडायचा असेल तर कलाकारांइतकीच प्रेक्षकांचीही जबाबदारी असते. याचे भान प्रेक्षकांना असायलाच हवे.    – मुक्ता बर्वे

प्रत्यक्षदर्शी अनुभव

तुरुंगातील आयुष्य, तिथला भ्रष्टाचार, त्या परिघात राहणाऱ्या लोकांची खालावलेली मानसिकता आणि अशा वातावरणाविरुद्ध बंड करत लढा देणाऱ्या तुरुंग अधीक्षकाची ही कथा आहे. हे साकारताना वास्तविकता जपण्यासाठी हुबेहूब बंदिशाळा उभारावी लागली. असे विषय आपल्याला केवळ ऐकीव किंवा वाचिक माहितीतून कळलेले असतात. परंतु आता त्याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव लोकांना मिळेल, असे दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी सांगितले. मराठी चित्रपट हे नावीन्यपूर्ण आशयासाठी पहिले जातात. तुरुंग आणि त्याभोवती गुंफलेला सामाजिक आशय हा अत्यंत ताकदीचा आणि संवेदनशील असल्याने ती साकारणाऱ्या अभिनेत्रीची सामाजिक जाणीव आणि अभिनयाचे कसबही तितकेच महत्त्वाचे होते. मुक्ताला समोर ठेवूनच कथा लिहिली गेली होती, असे त्यांनी सांगितले. जेलरच्या भूमिकेत एक स्त्री असणे हे काही लोकांना स्वीकारणे जड जाते किंवा आजवर आपण तसे पाहिलेले नसते. त्यामुळे अशा विषयाची मांडणी करणे हे आव्हानात्मक होते. मराठीत तुरुंग विश्वावर आधारलेला हा पहिलाच चित्रपट आहे. यातील नायिकेला जेवढय़ा कणखर आणि कठोर छटा आहेत तेवढीच ती हळवी आणि भावनिकही आहे. त्यात मुक्ताने ही भूमिका साकारल्याने याचे सकारात्मक निकाल चित्रपटगृहात दिसतीलच. साडेतीनशेहून अधिक कलाकार आणि साहाय्यकांचा समावेश चित्रपटात असल्याने दिग्दर्शक म्हणून एक वेगळी जबाबदारी होती. आम्हा सगळ्यांसाठीच हा वेगळा अनुभव होता, असे सांगतानाच सर्वाच्या अथक मेहनतीतून साकारलेल्या बंदिशाळा या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First Published on June 15, 2019 11:37 pm

Web Title: loksatta interview with mukta barve
Just Now!
X