01 March 2021

News Flash

‘बालकलाकार हवेत बालमजूर नकोत’

मध्यंतरीच्या काळात लहान मुलांचे रिअ‍ॅलिटी शो, त्यांच्या मालिका, त्यांचे चित्रपट अशी एकच लाट आली होती.

मध्यंतरीच्या काळात लहान मुलांचे रिअ‍ॅलिटी शो, त्यांच्या मालिका, त्यांचे चित्रपट अशी एकच लाट आली होती. आताही ती लाट कमी झालेली नाही मात्र रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मुलांना तणावाखाली वावरताना पाहून अगदी शूजित सिरकारसारख्या संवेदनशील दिग्दर्शकाच्याही काळजाचा ठोका चुकला. आणि त्याने लहान मुलांना मालिका-चित्रपटातून काम करण्यावर बंदी आणावी, अशी मागणी समाजमाध्यमांवर केली होती. त्यावर अनेक वादविवाद झाले पण त्यातून ठोस काही हाती लागले नाही. या पाश्र्वभूमीवर इरावती कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिके चा आधार घेत दिग्दर्शक रोहित शिलवंत याने ‘परी हूँ मै’ हा चित्रपट केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बालकलाकार, त्यांचे पालक आणि ग्लॅमरच्या जगात आल्यानंतर या लहानग्या कलाकारांच्या मनात होणारे बदल याची वास्तव आणि संयत मांडणी रोहितने केली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक रोहित शिलवंत, चित्रपटातील कलाकार नंदू माधव, देविका दफ्तरदार आणि फ्लोरा सैनी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. आणि बालकलाकारांच्या विषयावर सडेतोड मतं मांडली.

एकांकिकेत लहान मुलं कशी ग्लॅमरच्या मागे वाहवत जातात ही एकच बाजू होती. चित्रपट करताना तुम्हाला कथेचा विस्तार करायला वाव मिळतो. त्यामुळे इथे मालिका आणि चित्रपटांच्या ग्लॅमरमध्ये मुलांचं वाहवत जाणं हा एकच मुद्दा नव्हता. तर ती मालिका आणि चित्रपट करताना त्याबरोबर आलेलं ग्लॅमर, बदललेलं जग हे सगळं एका क्षणात संपतं. तेव्हा त्यांची काय अवस्था होते. त्यांना काम मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हेही मांडता आलं. त्यासाठी आम्ही पटकथेवर खूप मेहनत घेतली. यातली वडिलांची जी व्यक्तिरेखा आहे ती अगदी प्रेमळ स्वभावाची आहे. म्हणजे एखादी गोष्ट इतरांना पटत नसेल तर ती मोठय़ा प्रेमाने समजावून सांगून, वळवण्याची ताकद त्यांच्यात आहे. आणि ही किमया नंदू माधव यांच्याकडे आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे या भूमिकेसाठी ते एकदम फिट होते. देविका दफ्तरदार यांचे चित्रपट मी पाहिले होते. त्या आपल्या भूमिकेबाबत ठाम असतात. इथेही जी आई आहे ती तशी थोडी कडक आहे. ती चांगल्याला चांगलं म्हणते आणि वाईटाला वाईट म्हणते. फ्लोरा सैनी या हिंदीतील अभिनेत्री आहेत. त्यांच्याबरोबर मी हिंदीत काम केलं होतं. चित्रपटात मला मालिकेत काम करणारी स्टार अभिनेत्री हवी होती. आणि फ्लोरा यांनी स्वत: ते ग्लॅमर, ते जग अनुभवलं असल्याने त्यांची जान्हवी कपूरच्या भूमिकेसाठी मी निवड केली. हे तिन्ही कलाकार सक्षम असल्याने त्यांच्या बाबतीत मला फार काही मेहनत घ्यावी लागली नाही. मात्र या चित्रपटात परीची म्हणजे साजिरीची भूमिका करणाऱ्या श्रुती निगडेवर थोडी मेहनत घ्यावी लागली. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटात तिची भूमिका खूप मोठी आहे. शाळकरी साधंसोपं जीवन जगणारी मुलगी, मग मालिकेत काम करायला लागल्यावर ग्लॅमरमध्ये जगायला लागणारी मुलगी आणि हे सगळं हरवल्यानंतर त्याचा मानसिक आघात झालेली मुलगी असा खूप मोठा आलेख तिच्या भूमिकेला होता. आणि मुळात चित्रपटच या विषयावर असल्याने तिला खूप ताण देऊन आम्हाला काम करायचं नव्हतं. आम्ही याचं चित्रिकरणही उन्हाळ्याच्या सुट्टीत केलं. तिच्या कलाने आम्ही काम करत होतो. अगदी चित्रपटाचं पॅचवर्कही तिच्या सुट्टय़ा लक्षात घेऊनच पूर्ण केलं.    – रोहित शिलवंत, दिग्दर्शक

शूजित सिरकारने जे लहान मुलांनी कामच करू नये हा जो मुद्दा मांडला तो मला टोकाचा वाटतो. आपले चित्रपट, मालिका किंवा नाटक यातून आपल्या वास्तव जीवनाचंच चित्र प्रतिबिंबित होत असतं. त्यामुळे जर कथेत उल्लेख असेल तर आपल्याला अंथरूणाला खिळलेला वयस्कर माणूसही हवा आणि अगदी काही महिन्यांचं तान्हं बाळही असायला हवं. मात्र त्या तान्हया बाळाला घेऊन आपण किती वेळ चित्रिकरण करणार आहोत, याचं भान ठेवायला हवं. थोडक्यात त्यांचं व्यापारीकरण होता कामा नये, असं मला मुद्दामहून सांगावंसं वाटतं. आपल्याकडे मुलं अठराव्या वर्षांपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा विचार करतात त्या अनेकदा हौसेपोटी असतात. त्यानंतर त्यांना भान यायला लागतं की मला नेमकी कशात आवड आहे. मात्र पालक त्याचा विचारच करत नाहीत. अमूक एक गोष्ट चांगली करतो म्हणून मग त्याला त्यात पारंगत करण्यासाठी ते कंबर कसतात. घाई करतात. तसं होता कामा नये. मुलांना त्यांची नेमकी आवड लक्षात घेऊन त्यापध्दतीने प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे.  एकांकिकेचा विषय सांगितल्यावर मला स्वतला मुलगी असल्याने मी सहज त्याच्याशी जोडलो गेलो. तिनेही मला भूमिको करण्याविषयी विचारलं तेव्हा तुला आवड असेल तर एखादी भूमिका नक्की कर. पण तीन महिन्यानंतर पुन्हा अभ्यासाकडे वळलं पाहिजे. त्याचा मी व्यवसाय होऊ देणार नाही, असा त्यावेळी आमच्या दोघांमध्ये संवाद झाला होता. अर्थात तिला काही फार आवड नाही या क्षेत्राची.. त्यामुळे मग ते पुढे गेलं नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने माझे जे बरेवाईट अनुभव होते याविषयीचे ते साहजिकच जोडले गेले. त्याचवेळी मला माझी मानसिकता या माधव दिघे नामक वडिलांच्या व्यक्तिरेखेला जोडायची नाही हेही भान ठेवायचं होतं. कारण मी एक पालक म्हणून याबाबत सजग होतो मात्र कथेतला माधव दिघे तसा नाही. मुलांच्या संवेदना, स्त्रियांचं मन याबद्दल भान नसलेली कुटुंब रचना असते त्यातली ही एक व्यक्तिरेखा होती. मग दिग्दर्शक आणि आम्ही सातत्याने चर्चा करून त्यापध्दतीने ती व्यक्तिरेखा मी रंगवली.    – नंदू माधव, अभिनेता

माझी मुलगी तीन वर्षांची आहे. तुझ्याबरोबर ती काम करेल का, अशी विचारणा मलाही  झाली होती. तेव्हा मीही तिला सहज विचारलं पण तिने नाही म्हटल्यानंतर मग आग्रह धरला नाही. पण असं प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. रोहितची कथा ऐकल्यानंतर याबाबतीत नक्की काहीतरी काम व्हायलाच हवं असा विचार आला आणि मी होकार दिला. इथे चित्रपटात साजिरीचे जे वडील आहेत ते हुरळून गेलेत. त्यांना वाटतं आपल्या मुलीत अभिनयाचे गुण आहेत. तिला योग्य संधी मिळते आहे आणि त्यातून आपल्या घरी पैसाही येतो आहे जो आधी येत नव्हता. मात्र तिच्या आईचं तसं नाही आहे. तिला हे जाणवतंय की मुलीचं काम सुरू झाल्यानंतर गोष्टी वेगाने बदलल्या आहेत म्हणजे त्यातून फक्त सुख आलेलं नाही. तर अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. मात्र तिचा मुलीबरोबरचा संवादही हरवला आहे कारण ती घरात एकटी असते. तर मुलगी दिवसभर चित्रिकरणात असते. मग हे कुठेतरी थांबवायला पाहिजे, अशी गरज तिला वाटू लागते आणि मग ती पाठिंबा देते.   – देविका दफ्तरदार, अभिनेत्री

‘परी हूँ मै’ची गोष्ट आज लोकांना सांगण्याची खरंच गरज आहे हे मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. मी अभिनेत्री म्हणून जेव्हा ऑडिशनला जाते तेव्हा कुठून कुठून पुण्यातून आणि अन्य ठिकाणाहून लहान मुले ऑडिशनला आलेली असतात. दिवस-दिवस ही मुलं ऑडिशन देत असतात मग ती खेळतात कधी, अभ्यास कधी करतात हे सगळेच प्रश्न मनात येतात. आणि त्यांचे आईवडील त्यांच्याहीपेक्षा तणावात असतात. या आईवडिलांनी मुलाच्या परिक्षेचीही इतकी काळजी केली नसेल एवढे ते त्यांच्या ऑडिशनच्या बाबतीत त्रासलेले असतात. कॅमेऱ्यामागे उभे राहून तेच त्यांना पूर्ण अभिनय करून दाखवत असतात. अशावेळी त्या लहान मुलांना पुढे काय कळणार आहे? आपण नेहमी म्हणतो मुलांची आवड काय आहे, त्यांचं पॅशन काय आहे हे जोखून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे पण मुळात त्यांना त्यांची आवड काय हे समजून तर घेऊ द्यात.. त्याच्या आवडीतून आपण पैसे कमवायचा मार्ग शोधू लागतो. हा प्रकार एवढा वाढीला लागतो की बालमजूरी आणि यात काहीच फरक उरत नाही. आणि हे भान आजच्या पालकांना यायला हवं असेल तर हे वास्तव लोकांसमोर आलंच पाहिजे असं मला वाटत होतं. – फ्लोरा सैनी, अभिनेत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:47 am

Web Title: loksatta interview with pari hoon main cast
Next Stories
1 ‘बॉईज-२’ ची गोष्ट
2 ‘माझा अगडबम’चे शीर्षकगीत प्रदर्शित
3 नष्टचर्य
Just Now!
X