‘मी टू’ चळवळीने बॉलिवूडमध्ये चांगलाच वादळ आणलं होतं. मागील वर्षी ‘मी टू’ या चळवळीने चांगला जोर पकडला होता. प्रथम सिनेक्षेत्रातून सुरुवात होऊन खेळ, राजकारण, अशा विविध क्षेत्रातील मातब्बरांची नावे त्यात येऊ लागली. आलोक नाथ, विकास बहल, कैलाश खेर, रजत कपूर यांच्यावर अनेक स्त्रियांनी आरोप केले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने लैगिंक छळाबद्दल तिची मतं मांडली.

या मुलाखतीत माधुरी म्हणाली की, “फक्त सिनेसृष्टीतच नाही तर इतर सगळ्याच ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना, ट्रेन, बस किंवा इतर ठिकाणी दररोज लैगिंक छळाला सामोरे जावे लागते.”

ती पुढे असंही म्हणाली की, “लैगिंक छळ करणारा गुन्हेगार जर प्रसिद्ध व्यक्ती असेल तर सगळ्यांना त्याबद्दल माहिती असते. पण बाकीच्या अनामिक गुन्हेगारांचे काय? महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज आहे. पण ते वातावरण देण्यासाठी लोकांना सुशिक्षित करायला हवं. लैगिंक शोषणाविरोधात महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपला मुद्दा मांडायला हवा. यासाठी आपणच त्यांना मदत करायला हवी. ही लढाई कशी लढायची याविषयी लोकांना सज्ञान करायला हवे.”

‘मी टू’ चळवळीमुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसेबद्दल चर्चा सुरू झाली. महिलांनी लैंगिक हिंसा सहन करू नये व कायद्यातील यंत्रणांचा वापर करून स्वत:ला सुरक्षित करावे व कामाच्या ठिकाणी तसेच पोलीस तक्रार करण्यासाठी पुढे यावे हा या मोहिमेचा हेतू होता.