मल्याळम अभिनेता अनूप मेननला हेअर क्रिमची जाहिरात करणे महागात पडले आहे. या जाहिराती विरोधात ग्राहक मंचाने दंडात्मक कारवाई केली आहे. या जाहिरातीमध्ये सहा आठवडे सतत ही हेअर क्रिम लावल्याने केसांची वाढ होते असा दावा करण्यात आला होता. पण अनूपने हेअर क्रिमच्या परिणामांची खातरजमा न करताच जाहिरातीमध्ये काम केले आणि त्याला ते महागात पडले आहे.

अनूप विरोधात फ्रान्सिस वडक्कन नावाच्या एका व्यक्तीने तक्रार केली आहे. या व्यक्तीने ही जाहिरात पाहिली आणि क्रिम खरेदी केली होती. सहा आठवडे ही क्रिम वापरुनही काही फायदा होत नसल्याचे त्याला जाणवले. त्यानंतर संतापून त्याने हेअर क्रिम कंपनी आणि अभिनेता अनूप मेनन विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्याने ५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली.

याप्रकरणी ग्राहक मंचाने अनूप यांना विचारले असता त्यांनी ही क्रिम कधी वापरली नसल्याचे म्हटले आहे. ‘ही क्रिम मी कधी वापरली नाही. मी केवळ माझ्या आईने बनवलेले केसांचे तेल वापरतो’ असे त्यांनी म्हटले. तसेच जाहिरातीमध्ये काय दावा करण्यात आला आहे हे देखील माहिती नसल्याचे अनूपने सांगितले आहे.